वाहतूक कोंडीचा फायदा घेत आणि सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या चालकाचे लक्ष विचलित करून गाडीत असणाऱ्या महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या एका चोरट्याला अंधेरी पोलीस ठाण्याच्या दोन धाडसी पोलीस अंमलदारानी बुधवारी पाठलाग करून रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत. नाझीम अशफाक कुरेशी (२२) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंधेरी परिसरात वाहतूक कोंडीचा फायदा घेत तसेच सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या चालकाचे लक्ष विचलित करून गाडीत असणाऱ्या मोबाईल, लपटोप सारख्या महागड्या वस्तू चोरी करण्याच्या घटनांनी तोंड वर काढले होते. याला रोखण्यासाठी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात गस्त वाढवत विशेष दक्षता पथक निर्माण करण्यात आले होते.
बुधवारी पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार पप्पू मराठे व रविकांत चौधरी पोलिस स्टेशन हद्दीतील साटमवाडी जंक्शन येथून गस्त घालत असताना एक इसम गाडीतील किमती सामान घेवून पळताना आढळून आला. त्यांनी लगेच त्याचा पाठलाग करत चोरीच्या मुद्देमालासह त्याला रंगेहात पकडले.
‘भादवि कलम ३९७, ३४ नुसार गुन्हा नोंद करून नाझीम याला अटक केली असून, त्याच्या इतर साथीदारांचा आम्ही शोध घेत आहोत” असे तपासी अधिकारी दहिभाते यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मराठे आणि चौधरी यांच्या या कामगिरीबद्दल अंधेरी पोलिस ठाण्याचे वपोनि पंडित थोरात, पो नि गंरडे, सपोनि पाटील, पोउनि दहिभाते व पोउनि किसवे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments yet.