आयआयटी, पवई येथील एका हर्बल कंपनीच्या कार्यालयात घुसून, कामगाराला बांधून ठेवून, मारहाण करून त्याच्याकडील ९.५० लाखाची रक्कम जबरी चोरून नेल्याची घटना काल (रविवारी) दुपारी १२.३५ वाजता घडली. याबाबत पवई पोलिसांनी भादवि कलम ३९२, ३४२, ४५२, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद करून सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
आयआयटी येथील भवानी इंडस्ट्रीअल इस्टेटमध्ये असणाऱ्या उदय इ कॉमर्स, येथील मनेजर सुमित राठोड (२२) हे आठवडाभर त्यांच्याकडे जमा होणारी रक्कम रविवारी जमा करत असतात. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सुद्धा ते त्यांच्याकडे जमा झालेली ९.५० लाख रुपयाची रक्कम बॅगेत टाकून जमा करण्यासाठी निघालेले असताना, तोंडावर बुरखा घातलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून सुमितच्या तोंडाला पट्ट्या मारून, बांधून ठेवून त्यांच्याकडील रोकड घेवून तेथून पोबारा केला. असे सुमित याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
घटनेला दुजोरा देतानाच, “आम्ही आसपासच्या परिसरात असणाऱ्या सिसिटीव्ही कॅमेराचे फुटेज ताब्यात घेवून तपास सुरु केला आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
“सुमित प्रत्येक रविवारी मोठ्या रक्कमेची रोकड घेवून जातो हे त्यांना माहिती होते. त्याच्या बाहेर निघण्याच्या वेळेसच त्यांनी त्याला दरवाजापासून आत ढकलत नेऊन, त्याच्याकडील रक्कम पळवली आहे. चोरटे हे कंपनीतील कामगारांच्या किंवा कंपनीशी निगडीत व्यक्तीच्या ओळखीतले असावेत असा अंदाजही याबाबत बोलताना तपासी अधिकाऱ्यांनी वर्तवला.
No comments yet.