पवईतील पथदिव्यांच्या इलेक्ट्रिक बॉक्सची झाकणे चोरी करून विकणाऱ्या टोळीतील तिघांना काल दुपारी हिरानंदानी (कमांडो) एसटीएफ पथकाने चोरी करताना रंगेहाथ पकडून, पवई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्याजवळ त्यावेळी १० पेक्षा जास्त अल्युमिनियमची झाकणे आढळून आली आहेत. तिन्ही तरुण हे विशीच्या वयातील असून, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
याबाबत हिरानंदानी एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात परिसरात लावण्यात आलेल्या विजेच्या पथदिव्यांच्या इलेक्ट्रिक बॉक्सची झाकणे गायब होत असल्याचे निदर्शनास येत होते. याबाबत वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्याकडून तक्रार मिळत असल्याने एसटीएफला याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले होते.
‘गुरुवारी दुपारी आमचे पथक गस्त घालत असताना येथील मेन स्ट्रीटच्या भागात विविध इलेक्ट्रिक पोलच्या आसपास काही तरुण संशयास्पद रेंगाळताना आढळून आले. आम्ही त्यांच्यावर पाळत ठेवून असताना ते इलेक्ट्रिक पोलच्या विजेच्या बॉक्सची झाकणे काढत असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यांची धरपकड सुरु केली. ज्यापैकी तिघांना आमच्या पथकाने पकडले असून, त्यांचे इतर साथीदार हे पार्कसाईटच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले’ असे याबाबत बोलताना एसटीएफ पथकाने सांगितले.
अनिकेत पांचाळ, आदित्य गायकवाड, अक्षय सुरेश कदम अशी पकडण्यात आलेल्या तीन तरुणांची नावे आहेत. तिन्ही तरुण घाटकोपर येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, त्यांचा पळून गेलेला साथीदार अमीर सोयल उर्फ पिनू याच्या इशाऱ्यावरून ते काम करत असल्याची त्यांनी कबुली दिली असल्याचे सांगितले जात आहे.
No comments yet.