हिरानंदानीतील गलेरिया शॉपिंग मॉलमधील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात व समोरील मोकळ्या जागेत बदल करून आपली दुकाने वाढवल्यामुळे मॉलची दुर्दशा झाली आहे. स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता ते या मॉलकडे दुर्लक्ष करून आसपासच्या परिसरात असणाऱ्या मॉल्समध्ये खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत. या बद्दल राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. पालिकेतर्फे याबाबत तपासणी करून बदल केलेल्या दुकान मालकांना आणि मॉलची व्यवस्था पाहणाऱ्या हिरानंदानी प्रशासनाला पालिका ‘एस’ विभागातर्फे अतिक्रमण त्वरित हटवण्यासाठी ‘निष्कासन नोटीस’ देण्यात आली आहे. आणि तसे न झाल्यास पालिकेतर्फे स्वतः बेकायदेशीर दुकाने हटवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच पालिकेतर्फे अन्न व औषध प्रशासनाला तिथे चालणाऱ्या सर्व खानपानाच्या जागेंचे परवाने असल्याचा आढावा घेण्यास सुद्धा एक पत्र लिहून कळवण्यात आले आहे.
एकेकाळी हिरानंदानी सोबतच पवईची शोभा वाढवणारा गलेरिया मॉल सर्वांचाच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता. खरेदीदारीसाठी येणारे, फिरायला येणारे, खाद्य प्रेमी, तरुणाई अशा सर्वांचाच हा मनपसंद अड्डा होता; परंतु गेल्या काही वर्षात लोकांचा वाढता ओढ पाहता येथील काही दुकानदारांनी आपल्या दुकानात बदल करत आणि दुकानासमोरील मोकळ्या जागेचा वापर करत लोकांच्या चालण्याच्या जागेतच आपली दुकाने उभी केली. त्यामुळे लोकांना चालायला जागा शिल्लक राहिल्या नाहीत आणि गर्दी सुद्धा वाढू लागली. तळमजल्यावर काही दुकानांच्या समोर लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थाच्या खोक्यांमुळे मॉल परिसरात घाण वाढून सुंदर अशा मॉलची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनीसुद्धा आता या मॉलकडे पाठ फिरवत घाटकोपर, भांडूप, अंधेरी या ठिकाणी मॉलमध्ये जाणे पसंत केले आहे.
मॉलमध्ये वाढत चाललेल्या या अतिक्रमणाबद्दल स्थानिकांनी अनेकदा पालिका प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधीना तक्रारी दिलेल्या आहेत; परंतु बेकायदेशीर दुकाने कमी होण्याऐवजी वाढतच राहिल्यांनी अखेर स्थानिक नागरिक आणि लढाई लढणाऱ्या काही दुकानदारांनी सुद्धा हात टेकले. स्थानिक दुकानदारांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीचे युवा संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर सिंग यांनी पालिका प्रशासनाला २३ मार्च २०१५ रोजी तक्रार देवून बेकायदेशीर दुकानांचे जाळे पसरत आहे आणि मॉलला आगीचा धोका वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. ज्या वर पालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे.
याबाबत avartanpowai.info शी बोलताना सुधीर सिंग यांनी सांगितले “मॉलमध्ये कायदेशीर पद्धतीने दुकान चालवणाऱ्या अनेक दुकानदारांनी मॉल प्रशासनाकडे याबाबत तक्रार नोंदवल्या होत्या. त्यावर कोणतीची कारवाई करण्यात आली नाही उलट तो विळखा दिवसेंदिवस आणखीनच वाढत चालला आहे. याबाबत जेव्हा दुकान मालक माझ्याकडे तक्रार घेऊन आले तेव्हा पाहणीत असे आढळून आले कि, तिथे अनेक दुकाने ही बेकायदेशीर पद्धतीने चालू आहेत. पाणीपुरीवाला, डोसावाला, मोबाईल शॉप, लाइफस्टाइल वस्तू विकणाऱ्या अनेक दुकानदारांना भाडेतत्वावर दुकानासमोरील मोकळ्या जागा देण्यात आलेल्या आहेत. ज्यातून मोठी कमाई होत असून कारवाई रोखण्यासाठी हफ्ता सुद्धा दिला जातो आहे. ज्याबाबत मी पालिका प्रशासनाला तक्रार दिली होती. त्यानंतर ३० एप्रिलला पालिकेने मला दिलेल्या उत्तरानुसार ‘एप्रिल १६ तारखेला त्यांनी गलेरिया मॉलला भेट देऊन पाहणी केली असून तिथे अनेक दुकाने ही बेकायदेशीररित्या चालत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. एस वार्ड-अतिक्रमण निर्मुलन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन यांना जरुरी कारवाई बद्दल कळवण्यात आले आहे अशा आशयाचे पत्र पाठवले होते.” त्यानंतर अनेक कारवाई झाल्या आहेत आणि आदेश निघालेले आहेत. आता पालिकेने सर्व बेकायदेशीर दुकाने हटवण्याची नोटीस त्या दुकानदारांना बजावली आहे. मी इथेच न थांबता पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो आहे. लवकरच हा मुद्दा आमच्या पक्ष्याच्या नेत्यांकडून आता राज्यसभेत चर्चेला घेतला जाणार आहे.”
संबंधित मुद्द्यावर बोलताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले “आम्हाला तिथे होणाऱ्या बदल आणि वाढणाऱ्या बेकायदेशीर दुकानांबद्दल मिळालेल्या तक्रारीवरून परीक्षण करताना, पालिका प्रशासनाच्या परवानगी शिवाय सदर मॉलमधील तळमजला आणि पहिल्या माळ्यावरील अनेक दुकानात बदल करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे तसेच अनेक ठिकाणी लोकांच्या चालण्याच्या भागातच अन्न शिजवले जात असल्याचे आढळून आले आहे, जे पालिकेच्या नियमांच्या विरोधात आहे. अनेक दुकानदारांकडे परवाने नाहीत. हे पाहता आम्ही बेकायदेशीर दुकाने चालवणारे आणि प्रशासन अशा दोघांनाही ‘निष्कासन नोटीस’ दिली आहे आणि दिलेल्या वेळेत जर त्यांनी त्यांना हटवले नाही तर पालिका प्रशासन कडक कारवाई करेल.
दुकानदारांनी नाव न-जाहीर करण्याच्या अटीवर नोटीस मिळाली असल्याचे कबूल केले, तसेच ते त्या नोटीसीचा आदर करत सर्व हटवणार असल्याचे सांगितले. परंतु हा मुद्दा आताच का उठला या बाबत बोलताना समोर आले कि इथे दोन वेगवेगळे गट काम करत असून प्रत्येकाला इथे आपली सत्ता स्थापन करायची आहे, त्यामुळे ते एकमेकांची तक्रार नोंदवत आहेत. त्याने केले मी का नाही या द्वेषात संपूर्ण गलेरिया मॉल आज बेकायदेशीर दुकानांच्या विळख्यात जखडत चाललेला आहे.
No comments yet.