पाठीमागील अनेक वर्षांपासून शौचालयाच्या समस्येने त्रस्त, मोठ्या हलाखीत जगणाऱ्या तिरंदाज व्हिलेज मधील रहिवाशांना आता दिलासा मिळाला आहे. खासदार फंडातून सोयी-सुविधांनी भरपूर असे एक सुसज्ज शौचालय येथे बांधण्यात आले आहे. यामुळे पवईतील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या तिरंदाज व्हिलेज मधील रहिवाशांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आहे.
मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे पवई. महाराष्ट्राचे चौदावे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १९९९ साली मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यावर पवईतील एलएन्डटी उड्डाणपुलाच्या उद्धघाटन प्रसंगी मुंबईला शांघाय बनवण्याचे आपल्या सरकारचे स्वप्न असल्याचे बोलून दाखवले होते. त्यानंतर मुंबईत विकास कामांना वेग आला होता. मात्र ही घोषणा ज्या धर्तीवर झाली त्या पवईत या घोषणेच्या १८ वर्षानंतर सुद्धा स्थानिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
पवईतील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या तिरंदाज व्हिलेज भागात स्थानिक गेल्या अनेक वर्षांपासून शौचालयाच्या समस्येने त्रस्त होते. याबाबत त्यांनी स्थानिक प्रतिनिधींना वेळोवेळी पाठपुरावा करूनही काहीच फरक पडला नव्हता. त्यात महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेचा पवईतील हा गड मानला जायचा. मात्र याचाही काहीच फायदा या परिसराला झाला नाही. त्यात भर म्हणून की काय ऐन पावसाळ्यात दुरुस्तीच्या नावाखाली येथील तोडकेमोडके शौचालय सुद्धा तोडण्यात आल्यामुळे नागरिकांची चांगलीच कोंडी झाली.
‘कोणतीही पूर्वसूचना न-देता स्थानिक नगरसेवकांच्या आदेशावर एक दिवस अचानक आमच्या परिसरातील शौचालय तोडून टाकण्यात आले होते. जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी स्थानिकांना विचारण्यात आले होते अशी उत्तरे देत तुम्हाला तात्पुरते शौचालय बनवून देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात केवळ विटा एकमेकांवर रचून आणि पत्रे लावून दोन डब्बा शौचालये नागरिकांच्या सोयीसाठी देण्यात आली होती’ असे याबाबत बोलताना येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
मात्र जवळपास सहा महिने अत्यंत हलाखीच्या स्थितीत या समस्येच्या सामना करणाऱ्या तिरंदाज व्हिलेज येथील नागरिकांना आता दिलासा मिळला असून, एक सुसज्ज सोयी सुविधा युक्त सार्वजनिक शौचालय खासदार फंडातून येथे बांधण्यात आले असल्यामुळे लोकांचा जीव भांड्यात पडला आहे.
‘दसऱ्याच्या मुहुर्तावर तिरंदाज व्हिलेज गावठाण येथे खा. किरीट सोमैय्या यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन झाले. सार्वजनिक शौचालयात नळ असणारे पवईतील एकमेव शौचालय आहे. प्रत्येक शौचालयात नळ असल्याने पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शौचालयात पाणी महत्वाच आहे. महिलांसाठी ही बाब अत्यंत महत्वाची असते, कारण लांबून येणारे बरेच जण शौचालयाच्या जवळ राहणाऱ्यांच्या ड्रमातून पाणी वापरत. आता नळामुळे पाणी प्रश्न सुटला आहे, असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक राम खंदारे यांनी आपले मत सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडले आहे.
ते पुढे म्हणतात, ‘मे अखेरीस शौचालय तोडण्यात आले होते. तोंडावर असलेला पावसाळा, पर्यायी सोय यामुळे बराच संघर्ष झाला. मात्र उशिर झाला असला तरी आत्ताचे शौचालय सोयीस्कर आहे. येथील सोयी आणि स्वच्छता कायम टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल हे ही तितकेच खरे. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील (वहीणी) आणि सर्व प्रयत्न करणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार.’
हत्ती घेणे सोपे असतेय, पण त्याला पोसणे अवघड असतेय. या शौचालयांच्या बाबतीत तसे होऊ नये म्हणजे झाले ! असे मत ही येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत बोलताना नोंदवत एक प्रकारे याच्या देखरेख बाबत चिमटा काढला आहे.
No comments yet.