सुषमा चव्हाण
गर्दिच्या काळात पवईमधील बस स्थानकांवर बसमध्ये चढणाऱ्या लोकांचे पाकिट आणि मोबाईल चोरी करून, पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका सराईत चोरास, पवईतील युवा पत्रकार रविराज शिंदे आणि त्यांचे मित्र अजय सावंत, दत्ता दाभोळकर, राजेश हजारे यांनी पकडून पवई पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरेश चव्हाण उर्फ सुर्या असे पकडण्यात आलेल्या चोराचे नाव असून; सूर्या हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत मोबाईल व पाकिटमार आहे. त्याच्यावर भांडुप, विक्रोळी, पार्कसाईड, पवई अशा विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
बाजारात, गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये असलेल्या भरगच्च गर्दीचा फायदा घेत पाकिट व मोबाईल चोरीच्या घटना मुंबई भागात वाढत असतानाच, पवईतही अशा घटनेने तोंड वर काढले आहे. पवई पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात पोलीस तैनात करण्यासोबतच स्थानिक लोकांच्यात याबाबत जनजागृती ही केली आहे.
रविराज व त्यांचे मित्र हे आयआयटी येथील चहाच्या टपरीवर चहा पित उभे असताना, एक इसम संशयितरित्या बस स्टॉपवर वावरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बेस्ट बस बंद पडल्याने बस स्टॉपवर बरीच गर्दी निर्माण झाली होती. संशयित इसम येणाऱ्या प्रत्येक बसमध्ये चढत होता आणि लगेच पुढे उतरून परत बस स्टॉपवर परतत होता. काहीतरी घडत असल्याची शंका आल्याने रविराज आणि त्याच्या मित्रांनी त्या संशयित इसमावर आपली नजर केंद्रित केली. त्याचवेळी स्टॉपवर आलेल्या एका बसमध्ये तो इसम चढला आणि काही क्षणातच खाली उतरला तेव्हा त्याच्या हातात पाकिट दिसत होते. तरुणांनी वेळ न दवडता लगेच त्याला पकडले आणि पाकिटाबाबत विचारणा केली, परंतु समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलीस तपासात तो इसम पाकिटमारी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार सुरेश चव्हाण उर्फ सुर्या असून, पवई पोलीस त्याचा अनेक दिवस शोध घेत असल्याचे समोर आले.
चोराला पकडून दिल्याबद्दल पवई पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस निरिक्षक समीर मुजावर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी पवईच्या या दक्ष तरुणांचे मनःपूर्वक धन्यवाद देत आभार व्यक्त केले.
No comments yet.