नववर्षाच्या पूर्वसंध्येला नशेत गुंग झालेल्या ८ ते १० नशेखोर गर्दुल्यांच्या टोळीने, आयआयटी भागात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाच तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवत भोकसून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रात्री २ वाजता घडली. प्रदिप भदरगे (२८), विकास धिवार (३२), नितीन गच्छे (२७) आकाश ओव्हाळ, (२१) अक्षय सोणावणे (२४) असे जखमी झालेल्या तरूणांची नावे आहेत. सर्व तरूण पवईतील रहिवाशी असून, यातील प्रदिप, विकास, नितीन यांना गंभीर दुखापत झाल्याने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर आकाश आणि अक्षय यांना प्राथमिक उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने मुंबईकर संपूर्ण रात्र रस्त्यावर उतरले होते. पवईत सुद्धा ठिकठिकाणी रस्त्यावर लोकांची गर्दी होती. पवईची एक पर्यटनस्थळ म्हणून ओळख असल्याने, मुंबईच्या विविध भागातील लोकही येथील हिरानंदानी, पवई तलाव सारख्या भागात आले होते. असेच उत्साह साजरा करताना नशेमध्ये बेधुंद झालेल्या गर्दुल्याच्या टोळीने पवईतील विविध भागातून जाताना रस्त्यावर भेटलेल्या ५ तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
‘विकास धिवार या आपल्या मित्राला त्याच्या चैतन्यनगर येथील घरापर्यंत सोडायला त्याचा मित्र प्रदिप भदरगे हा गाडीवरून आला होता. विकासला सोडून परतत असताना रस्त्यात नशेत बेधुंद तरुणांनी प्रदिप याला बोलावून मारहाण करायला सुरुवात केली. त्याचे जोरजोरात ओरडणे ऐकून विकास त्याला वाचवण्यासाठी गेला असता नशेत बेधुंद तरुणांनी विकास आणि प्रदिप दोघांवर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी करून तेथून पळ काढला’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘पुढे रमाबाई आंबेडकरनगर येथे पालिका शाळेजवळ आपल्या मित्रांसोबत असणाऱ्या नितीन गच्छे यावर सुद्धा या गर्दुल्यांनी हल्ला करत त्याला सुद्धा गंभीर जखमी करत तेथून पळ काढला आणि आयआयटी मार्केट गेट जवळ चहाच्या टपरीवर उभे असणाऱ्या आकाश ओव्हाळ व अक्षय सोनावणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून तेथून पळ काढला. जखमींना दाखवलेल्या गुन्हेगारांच्या छायाचित्रांवरून त्यांनी दोन आरोपींची ओळख पटवली आहे. दोन्ही आरोपी नशेच्या पदार्थांचे सेवन करणारे असून, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील दोन आरोपींना पार्कसाईट पोलिसांकडून तडीपार सुद्धा करण्यात आले आहे.’
पवई पोलिसांनी याबाबत जीवे मारण्याचा प्रयत्नच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करत पवई, पार्कसाईट आणि कल्याण भागात आरोपींच्या शोधात टिम रवाना केल्या आहेत.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.