साकिनाक, पवई पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्ह्यांची नोंद नावावर असणाऱ्या नासिर अली मोहंमद शेख (३१) याची काही अज्ञात व्यक्तींनी गौतमनगर पाईप लाईन येथे डोक्यात बॉटल फोडून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना बुधवारी पवईत घडली आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद करून त्याच्या हत्येच्या मागील लोकांचा शोध सुरु केला आहे.
पवईतील निटी, गौतमनगर येथील झोपडपट्टीत नासिर हा आपल्या परिवारासोबत राहत होता. जबरी चोरी, मारामारी, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांच्या तक्रारी त्याच्याविरोधात मुंबईतील काही पोलीस ठाण्यात नोंद आहेत.
“गुन्हेगारी वृत्तीमुळे नशेच्या पदार्थांचे सेवन, दारू सारख्या व्यसनांच्या आहारी गेल्याने तो नेहमीच अशा व्यसनांच्या आधीन असणाऱ्या मित्रांच्या संगतीत असे. मंगळवारी सुद्धा तो अशाच काही मित्रांच्या संगतीत असताना, त्यांच्यात वाद निर्माण होवून ही हत्या झाली असावी असे समोर येत आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटना स्थळावर पोलिसांना फुटलेल्या बियरच्या बॉटल्स आणि डोके ठेचण्यासाठी वापरलेले दगड मिळून आले आहेत.
“गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याचे शत्रू अनेक असू शकतात. मात्र त्या रात्री त्याच्या सोबत कोणी होते का? याचा आम्ही शोध घेत आहोत,” असे याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.