आयआयटी: प्रतिनिधी
भावी पिढीला वाहतुकीचे नियम समजावेत आणि जनजागृती व्हावी म्हणून, मुंबई वाहतूक पोलीस व पवई इंग्लिश हायस्कूल तर्फे शाळेच्या प्रांगणात प्रात्यक्षिक स्वरूपातील ‘वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण’ या विषयावर एका कार्याक्रमाचे आयोजन केले होते. यात शाळेतील लहान मोठ्या अशा सर्व मुलांनी सहभाग घेऊन वाहतुकीचे नियम समजून घेतले.
वाहन ही चैनीची वस्तू नसून, ती सध्याची गरज बनली आहे. विज्ञानाने मानवाला दिलेली ही देणगी शाप बनू लागली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीचे नियम न पाळणे. देशात प्रत्येक वर्षी २,७८,८०० अपघात होतात. हे अपघात जर रोखायचे असतील, तर यासाठी विद्यार्थीदशेतच मुलांना वाहतुकीचे नियम आणि जबाबदाऱ्या समजून देणे आवश्यक आहे. चालकामधील समजूतदारपणा अपघात टाळू शकतो, तेव्हा मुलांना जागरूक करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आणि पवई इंग्लिश स्कूल एकत्रित आले होते. या शाळेतील विविध वर्गातील मुलांसाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहतूकीचे नियम समजावण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि वाहन चालवताना घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन करतानाच, एक जागरुक नागरिक म्हणून अपघाताच्या ठिकाणी मदत आवश्यक असते, तेव्हा अशा प्रसंगी वाहतूक पोलिसांना किंवा अपघातात जखमींना त्वरित मदत करण्याचे आवाहन सुद्धा वाहतूक पोलिसांतर्फे यावेळी करण्यात आले. बरीच मुले लहान वयातच वाहन चालवायला सुरवात करतात, तेव्हा योग्य परवान्याशिवाय वाहन चालवू नये, पोलिसांना त्यांचा अधिकार विचारण्यापेक्षा, आपलं कर्तव्य जाणून घेतलं पाहिजे, असे आवाहन सुद्धा वाहतूक पोलिसांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
शेवटी केवळ मुलांना सभाग्रहात बसून उपदेशाचे डोस न देता प्रात्यक्षिक स्वरुपात दुर्गादेवी शर्मा मैदानात मुलांना वाहतुकीचे नियम आणि चिन्हे वाहतूक पोलिसांनी समजावून दिल्या.
No comments yet.