पवई किडनी रॅकेट: आरोपी रुग्ण ब्रिजकिशोर यांचे सुरतमध्ये निधन

jaiswalखोट्या कागदपत्रांच्या आधारे किडनी मिळवणाऱ्या सुरत येथील व्यावसायिक व पवई किडनी रॅकेटमधील आरोपी ब्रिजकिशोर जैस्वाल यांचा सुरत येथे बुधवारी मृत्यू झाला आहे. जैस्वाल यांचे वकील यांनी याबाबत पवई पोलिसांना माहिती कळवली असून, पुढच्या सुनावणीच्या वेळी याबाबत कोर्टाला पवई पोलिसांकडून कळवले जाणार आहे.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका महिलेस सुरत येथील व्यावसायिकाची पत्नी दाखवून किडनी दिली जात असल्याची माहिती १४ जुलै रोजी पवई पोलिसांना समाजसेवकांनी दिल्यानंतर, पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया रोखली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी सुरुवातीला याचा मुख्य सुत्रधार भैजेंद्र भिसेनसह नऊ आरोपींना अटक केली होती. पुढील तपासात निष्काळजीपणा बाळगल्याबद्दल हिरानंदानी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना सुद्धा अटक करण्यात आली होती.

ब्रिजकिशोर जैस्वाल यांचा सुरत येथे कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच किडनी रॅकेटचा प्रमुख सुत्रधार भैजेंद्र भिसेन याच्याशी त्यांची ओळख झाली. त्याने त्यांना किडनीदाता मिळवून देण्याचे आश्वासन देत ५० लाखात संपूर्ण सौदा पक्का केला.

भिसेन याने आनंद, गुजरात येथील घरकाम करून घर चालवणाऱ्या व कर्जात बुडालेल्या शोभा ठाकूर या महिलेस २ लाखाचे आमिष दाखवून किडनीदाता बनण्यास तयार केले. खोट्या कागदपत्राच्या आधारे त्यांना पती पत्नी दाखवून हिरानंदानी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा कट चालू असतानाच पवई पोलिसांनी यास रोखले होते.

गुन्ह्यात ब्रिजकिशोर व त्यांचा मुलगा किशन यांना सुद्धा पवई पोलिसांनी अटक केली होती. मात्र ब्रिजकिशोर यांना सतत उपचाराची गरज असल्याचे कारण पुढे करत दिंडोशी सत्र न्यायालयातून दोघांना जमीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर ते आपल्या गावी सुरत येथे निघून गेले.

त्यांच्यावर वाराणसी येथे उपचार सुरु होते, मात्र अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी पवई पोलिसांना दिली आहे.

या बातमीला पवई पोलिसांनी दुजोरा देत पुढच्या सुनावणीच्या वेळेस ते याबाबत कोर्टास कळवणार असल्याचे पवई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!