पालिका निवडणुकीसाठी पवईत नवीन चेहऱ्यांना संधी

हिना अखेरीस होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी पालिका एस विभागा अंतर्गत येणाऱ्या पवईतील प्रभाग क्रमांक १२०, १२१, १२२ मध्ये यावेळेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस आणि मनसे या प्रमुख पक्षांतर्फे अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, मराठी मतांसाठींची आणि अस्तित्वाची लढाई जोरदार रंगणार आहे. वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून भलत्याच उमेदवाराला तिकीट दिल्याने काही पक्षात नाराजीचे सूर सुद्धा उमटले असून, बंडखोरी करत अशा कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याने यंदाची लढाई अजूनच चुरशीची होणार आहे.

प्रभाग फेररचनेमुळे येथील मतदार संघात बरीच उलथापालथ झाली आहे. प्रभागाच्या सीमारेषा बदलल्याने व महिला आरक्षणामुळे बऱ्याच नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादीची गड राखण्याची लढाई

पालिकेत भगवा फडकत असला तरी पवईतील तिरंदाज प्रभागातून (नवीन १२२, जुना ११५) राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व कायम राहिले आहे. येथील शर्मा परिवारातील चित्तरंजन शर्मा, चंदन शर्मा व चारू शर्मा यांना प्रत्येक वेळेस मतदार राजाने भरघोस मताने निवडून दिले आहे. मात्र यावेळेस हा प्रभाग ओबीसी महिला आरक्षित झाल्याने या परिवारातील कोणीच मैदानात उतरू शकत नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटातील व शर्मा परिवाराचे निकटवर्तीय असणाऱ्या जया व्यंकटगिरी यांना जनतेचा कौल घेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

पवईला विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या शर्मा परिवारातील चारू चंदन शर्मा यांना यावेळी पवई, सूर्यानगर प्रभाग क्रमांक १२० मधून तर पासपोली प्रभाग क्रमांक १२० मधून हेमलता पालवणकर मैदानात आहेत.

जनता दलातून निवडून आलेल्या चित्तरंजन शर्मांची परंपरा कायम ठेवत १९९७ मध्ये चंदन शर्मा अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर पालिकेची लढाई लढत आतापर्यंत त्यांनी तिरंदाज येथील गड आपल्याकडे राखून ठेवला आहे. मात्र यावेळी आरक्षण असल्यामुळे जया व्यंकटगिरी यांना मैदानात उतरवून राष्ट्रवादीसाठी आपला गड कायम राखण्याची लढाई झाली आहे.

१९९२ पुनरावृत्तीसाठी शिवसेनेचा नवीन चेहरा

प्रभाग आरक्षणाचा फटका शिवसेनेलाही बसला आहे. सत्तापालटसाठी गेली कित्येक वर्ष तळागाळातील लोकांची कामे करून लोकांची मने जिंकलेल्या इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी सत्तापालट होणार अशी आशा पल्लवीत झालेली असतानाच आरक्षणामुळे सगळेच फसले. त्यावर उपाय शोधत उच्चशिक्षित व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या डॉक्टर स्नेहल मांडे यांना प्रभाग क्रमांक १२२ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. १२१ मधून चंद्रावती मोरे आणि १२० मधून राजराजेश्वरी रेडकरी मैदानात आहेत.

पवईमध्ये शिवसेनेची बांधणी मजबूत असतानाही १९९२ ला पहिल्यांदा आणि एकमेव वेळा प्रभाग क्रमांक ११५ (सध्याचा १२२) मधून उज्वला शिर्के शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. १९९७ च्या निवडणुकीनंतर दुसऱ्या स्थानावर फेकल्या गेलेल्या शिवसेनेला पुन्हा ते प्रथम स्थान मिळू शकले नाही आहे. २० वर्ष सतत संघटना मजबूती करणात गुंतलेल्या शिवसैनिकांना ते सुगीचे दिवस आणि सत्ता पुन्हा येथे प्रस्थापित करून १९९२ ची पुनरावृत्ती करायची आहे.

मात्र, सत्तांतरासाठी सज्ज झालेल्या शिवसेनेला ऐन निवडणुकीत एक मोठा धक्का बसला आहे. वर्षानुवर्ष पक्ष संघटनेशी एकनिष्ठ, प्रबळ दावेदार व जुन्या कार्यकर्त्यांना डावलत स्नेहल मांडे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यामुळे नाराजीचे सूर उमटले आहेत. शिवसेनच्या या कृत्याबाबत बंद पुकारत शाखा १२२ च्या महिला शाखाप्रमुख सुरेखा चव्हाण या अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरल्या आहेत. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या एकनिष्ठांची विभागणी झाली आहे, त्यामुळे शिवसेनेचे हे स्वप्न पूर्ण होणार का हे २३ तारखेलाच नक्की होईल.

कॉंग्रेस तर्फे पूर्व नगरसेविका मैदानात

राष्ट्रवादीची साथ सुटल्यानंतर स्वतंत्र लढणाऱ्या कॉंग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १२० मधून प्रतिभा शिवाजी माने, १२१ मधून अंजुम खान आणि विशेष आकर्षण असणाऱ्या १२२ मधून पूर्व नगरसेविका डॉक्टर अंजली दराडे अधिकृत उमेदवार म्हणून लढाई लढतील. कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या गटबाजीमुळे कॉंग्रेस ब्याकफुट फेकली गेली आहे. अशातच मानाची लढाई असणाऱ्या पवईच्या तिरंदाज प्रभागातून १९९० पासून पक्षासोबत असणाऱ्या समाजसेवक आणि माजी नगरसेविका डॉक्टर अंजली दराडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

इतर पक्षांनाही आरक्षणामुळे नवीन चेहऱ्यांचीच गरज भासली आहे. प्रभाग क्रमांक १२२ मधून मनसे तर्फे सुजाता चव्हाण, भाजप तर्फे वैशाली पाटील तर कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड मनीषा शित्रे मैदानात आहेत. १२१ मधून बहुजन मुक्ती पार्टीच्या भाविर प्रतिमा, आर पी आय (अ)च्या जगदेवी बनसोडे, एएमआयएएमच्या वर्षा दवंडे, संभाजी ब्रिगेडच्या दिपिका जाधव, मनसे तर्फे वैशाली सकटे, बिएसपीच्यावतीने सुषमा बिऱ्हाडे तर भारिप तर्फे वंदना सोनावणे मैदानात आहेत.

याच प्रभागातून विजया बोराडे, इंदू दामोदर पाईकराव, प्रज्ञा गायकवाड, साबळे सुगलाबाई, ज्योत्स्ना सोरटे, कल्पना खाडे आणि आशा इंगळे असे सात उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात आहेत.

मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरले असले आणि प्रत्येकजण सत्ता मिळवण्याचा दावा करत असला तरी यांचे भवितव्य हे मतदार ठरवणार आहेत. आपले भविष्य आणि चांगला उमेदवार निवडण्यासाठी सर्वांनी बाहेर पडून २१ फेब्रुवारीला आपला हक्क बजावणे आवश्यक आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!