पवईला खड्डयांचा वेढा; पालिकेची ‘खड्ड्यांचे फोटो पाठवा’ मोहीम खड्ड्यात?

‘एस’ विभाग अधिकाऱ्याचा नंबर ‘नॉट रिचेबल’, वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ

@रमेश कांबळे, अविनाश हजारे

पवईतील अनेक भागात पूर्व मोसमी पावसाने दैना करत ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हरेकृष्ण रोड आणि पद्मावती रोड रस्तावरती खड्डयांचे साम्राज्य म्हणजे पवईकरांसाठी नेहमीचेच असते. पालिकेने आपल्या विभागातील खड्डयांचे फोटो पाठवा म्हणत मुंबईतील सर्वच विभागाच्या रस्ते अभियंत्यांचे व्हॉटस्ऍप नंबर जाहीर केले आहेत. परंतु ‘एस’ विभागाच्या रस्ते अभियंत्याचा व्हाट्सऍप नंबर बंद असल्याने तक्रारदारांची मोठी गैरसोय होत असून, खड्डयांचा फोटो पाठवा, २४ तासांत बुजवणार असा गाजावाजा करणाऱ्या पालिकेच्या मोहिमेचे पितळ दोन दिवसात उघडे पडले आहे.

वायू चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून, मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून लांबला आहे. पालिकेने अनेक भागात पावसाळापूर्व कामे आटोपण्यास सुरुवात केली आहे. त्यांनतरही पावसाळय़ात रस्त्यावर खड्डे पडल्यास त्यांची माहिती मिळवत मुंबईकरांची गैरसोय रोखण्यासाठी पालिकेने ठोस पाऊले उचलत विभागानुसार व्हॉटस्ऍप नंबर जाहीर केले आहेत.

पावसाळय़ात तुमच्या विभागात रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचा फोटो पालिकेला व्हॉटस्ऍपवर पाठवा, हा खड्डा २४ तासांत बुजवला जाईल असा दावा करत यासाठी पालिकेने २४ वॉर्डसाठी २४ व्हॉटस्ऍप नंबर जाहीर केले आहेत. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे मुंबईकरांना पावसाळय़ात मोठा दिलासा मिळेल असे वाटत असतानाच, भांडूप “एस” विभागांतर्गत असणाऱ्या खड्डयांचे फोटो पाठवण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला असता तो नंबर (८८७९६५७६०३) बंद असल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात एस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘सदर व्हाट्सऍप नंबरधारक अधिकारी रजेवर असल्याचे सांगितले. परीक्षण विभागातील दुय्यम अभियंता यांना खड्डे कधी बुजवणार? असे विचारले असता, ते सांगता येत नाही पण आम्ही खड्डे बुजवू असे उत्तर दिले. या उत्तरामुळे पालिकेचा २४ तासात खड्डे बुजवू हा दावा किती फोल आहे हे समजते.

पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे विभागातील नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. अनेक वर्षापासून हरेकृष्ण रोड आणि पद्मावती रोड या रस्तावरती खड्डयांचे साम्राज्य असते. येथे अनेक वेळा अपघात घडले आहेत. गेल्या वर्षी येथील खड्यात मोटारसायकल गेल्याने गाडीवरून पडून एका इसमाचा मृत्यू झाला होता. या वर्षीसुद्धा परिसरात जीवघेणे खड्डे पडले आहेत. पालिकेला अजून काही जीव गेल्यानंतरच जाग येणार का??? असा संतप्त प्रश्न सुद्धा स्थानिक नागरिकांनी याबाबत बोलताना केला.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!