स्थानिक नागरिक, मच्छिमार व राजकीय प्रतिनिधी देणार पोलीस व पालिकेला सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र
पवई तलावात मासेमारीसाठी जाणाऱ्या लोकांवर होणारे मगरीचे हल्ले वाढलेले आहेत. जे पाहता तिरंदाज व्हिलेज आणि स्थानिक परिसरातील लोक पोलीस आणि पालिका प्रशासन यांना सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र देणार आहेत. पवई तलावातील ठराविक भागात सुरक्षा कुंपण टाकून स्थानिक मच्छीमारांसाठी ती जागा मासे पकडण्यासाठी सुरक्षित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि शाखाप्रमुख सुद्धा स्थानिकांचा वाढता प्रश्न पाहता, प्रशासनाकडे योग्य ती दखल घेण्याची मागणी करणारे पत्र देणार असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
पाठीमागील आठवड्यात गुरुवारी सकाळी पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेले तिरंदाज व्हिलेज येथे राहणारे मच्छिमार बाबू भुरे (५०) यांच्यावर पद्मावती मंदिराजवळ मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मगरीने केलेला हा पहिला हल्ला नाही. गेल्या काही वर्षात १५ पेक्षा जास्त हल्ले मच्छिमारांवर पवई तलावात झाले असून, स्थानिक मच्छिमारांच्या आकड्यानुसार केवळ पाठीमागील वर्षी ५ लोकांवर मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. ऑगस्ट २०१० साली मगरीने केलेल्या हल्यात तिरंदाज येथील विजय भुरे या तरुणास आपला जीव गमवावा लागला होता.
वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी प्रशासनाने तलावात मासेमारीसाठी सीमारेषा बनवून त्या जागेस कुंपण तयार करावे अशी मागणी आता स्थानिक करत आहेत.
स्थानिक नागरिक राजू भुरे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले, “पूर्वी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात मगरी येथे नसत, आता त्या कोठून ऐवढ्या वाढल्यात समजत नाही. आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांपैकी जास्तीत जास्त हे तलावात असणाऱ्या नर मगरीने केले आहेत. आम्ही पिढीजात पवई तलावात मासेमारी करतो आहे. आमच्या उपजीविकेचे हे एकमेव साधन आहे, भितीने हे बंद करायचे म्हटले तर आम्ही जगायचे कसे? तेव्हा प्रशासनाने एक ठराविक भागात कुंपन टाकून, मगरी येणार नाहीत याची सोय करून, तो भाग आम्हास मासेमारीसाठी द्यावा अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आम्ही पालिका व पोलीस यांना लवकरच पत्रव्यवहार सुद्धा करणार आहोत.”
“पवई तलावाचे सुशोभिकरण करताना मगरींची बसण्याची ठिकाणे नष्ट झालेली आहेत, त्यामुळे मगरी आता अनेक ठिकाणी झाडाझुडपात लपत आहेत. तेव्हा तशी सूचना देणारे सूचनाफलक परिसरात लावण्यात यावेत. गणेशोत्सवाच्या काळात जसे तात्पुरते कुंपण बनवले जाते, तसेच कायमस्वरूपी कुंपण प्रशासनाने तलावात मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी बनवावे. मच्छिमारांनी सुद्धा केवळ टायरवर बसून पाण्यात मासेमारीसाठी न-उतरता, छोटी बोट घेऊन दोन-तीन लोकांनी मिळून त्याद्वारे मासेमारी करावी”, असे आवर्तन पवईशी बोलताना श्रीमती हेगडे यांनी मत मांडले.
मात्र काही स्थानिकांचे म्हणणे आहे कि, मगर जेव्हा तिला त्रास दिला जातो तेव्हाच हल्ला करते, त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांनी याची काळजी घेणे आवश्यक आहे.
“प्रशासनाला अवैद्य मार्गाने होणारी मासेमारी रोखणे आवश्यक आहे. पवई तलावात उभारण्यात आलेल्या कारंज्या आणि चालू असणाऱ्या कामामुळे मगरींनी आपल्या जागा बदललेल्या आहेत. तलाव भागात विसर्जन घाटा व्यतिरिक्त मगरींचा वावर असणाऱ्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सूचना फलक लावणे आवश्यक आहे.” असे प्राणीमित्र सुनिश सुब्रामण्यम म्हणाले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.