गेली अनेक वर्ष पर्यायी मार्गासाठी लढणाऱ्या रहेजाकरांना त्यांचा हक्काचा पर्यायी मार्ग अखेर खुला झाला आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांच्या हस्ते रहेजा विहार ते साकीविहार रोड हा पर्यायी मार्ग रहेजाकरांसाठी खुला करण्यात आला आहे. कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार, स्थानिक नगरसेविका सविता पवार, महानगरपालिका अधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
रहेजा विहार हा पवईच्या काही प्रमुख परिसरांपैकी एक. याच्या निर्मितीपासून चांदिवली फार्म रोडच्या दिशेने बनवण्यात आलेला असा एकमेव मार्ग उपलब्ध होता. जसजसा या परिसराचा विकास होत गेला आणि लोकसंख्या वाढू लागली तशी पर्यायी मार्गाची गरज भासू लागली. चांदिवली फार्म रोडवरील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे तर रहेजाकर जास्तच त्रस्त झाले होते. जे पाहता नागरिकांनी त्यावेळचे स्थानिक नगरसेवक शरद पवार यांच्या मदतीने महानगरपालिकेकडे साकीविहार रोडच्या दिशेने अथवा आदिशंकराचार्य मार्गाकडे परिसरासाठी पर्यायी मार्ग दयावा याबाबत पाठपुरावा सुरु केला. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर २८ ऑगस्टला रहेजा विहार, मीनल कॉम्प्लेक्स, हर्षवर्धन मार्गे साकीविहार रोडकडे जाणारा मार्ग रहेजा विहार आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.
या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना कुर्ला तालुका अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “मी नगरसेवक असताना स्थानिक नागरिकांनी ही समस्या मांडली होती. मी सुद्धा त्याच परिसरात राहत असल्याने परिस्थिती चांगलीच जाणून होतो, तेव्हा याबाबत महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरु केला. साकीविहार रोड ते रहेजा विहार या रस्त्यात अनेक विकासकांच्या जागा व डोंगराळ भाग होता, त्यासाठी सर्वांची अनुमती घेणे जरुरी होते, जे पाहता पालिका प्रशासन व विकासकांच्या एकत्रित मिटिंग घेऊन आम्ही सर्वांना या कार्यासाठी तयार केले. रस्त्याच्या कामाला सुरवात केली. अनेक विकासकांच्या ताब्यात असलेल्या जागा, त्या ठिकाणी येणारी झाडे आणि डोंगराळ भाग यांना हटवण्याची अनुमती मिळवण्यात वेळ गेल्याने उशिरा पण अखेर ६० फुटी रुंद हक्काचा पर्यायी मार्ग रहेजा विहारकरांना मिळाला आहे. ज्यामुळे चांदिवली फार्म रोडकडून येणाऱ्या एकमेव रस्त्यावरील भार कमी होऊन साकीविहार रोडकडे जाणाऱ्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे.”
ते पुढे म्हणाले “रहेजा विहारकडील ५% रस्त्याच्या भागात काही बांधकाम असल्याने तेथील भागात केवळ १० फुट रुंद रोड बनवण्यात आलेला आहे. येत्या काही महिन्यात त्यांना पर्यायी जागा देऊन तो रोड सुद्धा १६ फुट रुंद बनवण्यात येईल, तो पर्यंत रहेजा विहारकरांना हा रस्ता एकतर्फी साकीविहार रोडकडे जाण्यासाठी वापरण्यात येणार आहे, रस्त्याच्या रुंदीकरणानंतर हा रस्ता दुतर्फा करण्यात येईल. मीनल, आणि हर्षवर्धनमध्ये राहणारे नागरिक मात्र पहिल्या दिवसांपासूनच हा रस्ता दुतर्फा वापरू शकणार आहेत.
स्थानिक नागरिक देखील या रस्त्याच्या निर्मितीमुळे खुश आहेत; परंतु जुन्या रस्त्याच्या दुतर्फा ज्याप्रकारे वाहने उभी केली जातात तशी या रस्त्यावर सुद्धा उभी केली गेली तर वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रहेजा विहारमध्ये साकीविहार रोडकडून प्रवेश करणारे लोक उलट दिशेने प्रवेश करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे असे सुद्धा नागरिकांचे म्हणणे आहे.
तुंगा-गाव येथील गावदेवी चौकात नगरसेवक निधीतून निर्माण करण्यात आलेल्या अतिप्रखर दिवाब्बतीचे लोकार्पण सुद्धा यावेळी सचिनभाऊ आहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments yet.