लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर मैत्री करून फसवणूक करणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेडया

मोठा उद्योगपती असल्याचे सांगून २७ वर्षीय एमबीए तरुणीशी लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर मैत्री करून, लग्नाचे वचन देवून, अश्लील फोटोद्वारे बदनामी करण्याची धमकी देत तिच्याशी संबंध बनवणाऱ्या कोलकता येथील एका चहावाल्याला पवई पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. गौरव शाव (३०) असे या तरुणाचे नाव असून, बुधवारी त्याला अंधेरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पवईतील एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्या तक्रारदार तरुणीने लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर आपले खाते बनवले होते. याच संकेतस्थळावर गौरव शाव याने आपण एक मोठा उद्योगपती असल्याचे सांगत तरुणीशी मैत्री केली. अंधेरी येथे स्वतःचे घर व राज्यभरात विविध ठिकाणी कंपनी असल्याचे सांगून वेळोवेळी गौरव तरुणीला भेटायला मुंबईला येत असे. मात्र तो कोणी उद्योगपती नसून एक चहा विक्रेता असल्याचे पितळ उघडे पडताच, त्याने तरुणीला अश्लील चित्रीकरण पसरवून बदनामी करण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. या सर्वाला कंटाळलेल्या तरुणीने अखेर गेल्या वर्षी १२ डिसेंबरला पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

“लग्न जुळवणार संकेतस्थळावर मैत्री झाल्यावर गौरवने मोठा उद्योगपती असल्याचे सांगत मला लग्नासाठी मागणी घातली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तो अनेकदा मला भेटण्यासाठी मुंबईला सुद्धा आला होता. माझा विश्वास संपादन करून त्याने स्काईपद्वारे माझे अश्लील चित्रीकरण केले. त्याचे सत्य समोर येताच त्याने मला त्या चित्रीकरणाच्या आधारे धमकावयास सुरुवात केली” असे तरुणीने आपल्या पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

“तक्रारदार तरुणी गौरवला तिच्या आई वडिलांना भेटायची मागणी करता तो नेहमीच टाळाटाळ करत असे. तो कोणी मोठा उद्योगपती नसून, डमडम रेल्वेस्थानकाबाहेर चहाची टपरी चालवतो, त्याच्या वडिलांचा साबणाचा व्यवसाय आहे. हे सत्य समजताच तरुणीच्या पायाखालची जमिनच सरकली आणि त्या दिवसापासून ती गौरवला टाळू लागली. मात्र, त्याने तिला बोलणे बंद केल्यास सोशल साईटवर चित्रीकरण पसरवण्याची धमकी दिली.” असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

“आमच्याकडे पवई पोलिसांच्या टिमने मदतीची मागणी केल्यानुसार, चित्तूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बी के पाल रेसिडन्स येथे धाड टाकत गौरवला अटक केली. येथील स्थानिक न्यायालयात हजर करून पवई पोलिसांनी संक्रमण पोलीस कोठडीची मागणी केली होती, ज्याला सन्माननीय न्यायालयाने मंजुरी दिली” असे पोलीस उप-आयुक्त (उत्तर कलकत्ता) शुभांकर सिन्हा सरकार यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाई महाडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनघा सातवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी व पोलिस शिपाई उज्वल पाटील यांनी ही कारवाई केली. त्याने अन्य कोणाला अशा प्रकारे फसवले आहे का? याचा सुद्धा पवई पोलिस शोध घेत आहेत.

भादवी कलम ४१७, ३५४, ३५४ (क), ५०६ नुसार गुन्हा नोंद करून गौरवला अटक केली असून, बुधवारी अंधेरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!