हिरानंदानी येथील ओर्चीड एव्हेन्यू रोडवरील हिरानंदानी स्कूल शेजारील गटाराचे घाण सांडपाणी संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने, येथील विद्यार्थ्यांसह पवईकरांना गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. शाळेतील मुले आजारी पडत असल्याबाबत मुलांच्या पालकांकडून तक्रारी सुद्धा केल्या जात आहेत. पाठीमागील वर्षी समस्येचे निवारण करण्याचे सांगणाऱ्या हिरानंदानी प्रशासनाला अजूनही ते शक्य होत नसल्याने अजून किती दिवस या समस्येशी लढायचे असा संताप सुद्धा पालकांकडून व्यक्त होत आहे.
मुंबईचे हृदय असणाऱ्या पवईचे प्रमुख आकर्षण आहे ते हिरानंदानी संकुल. इथल्या उंच उंच इमारती, साफसुथरे रस्ते, उत्तम व्यवस्थापन, क्षणात उपलब्ध होणाऱ्या सर्व सुखसुविधा अशा अनेक कारणांमुळे हा परिसर पवईचा ताज बनला आहे. याच हिरानंदानीत गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना गटाराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याने पवईकर त्रस्त झाले आहेत.
याबाबत मनपा प्रशासन आणि हिरानंदानी व्यवस्थापन यांना वारंवार तक्रारी करून सुद्धा ही समस्या जैसी थी असून, सुटण्याचे नाव घेत नाही.
या संदर्भात बोलताना स्थानिक नागरिक आणि शाळेतील मुलांच्या पालकांनी सांगितले, “हे याच वर्षी घडतेय असे नाही;पाठीमागील दोन वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. याबाबत मनपा आणि शाळा प्रशासनासोबतच हिरानंदानी व्यवस्थापनाला तक्रार दिल्यानंतर तात्पुरता पर्याय काढण्यात आला होता. पुढच्या वर्षी असे घडणार नाही असे सुद्धा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. मात्र, या वर्षी सुद्धा समस्या आहे तशीच आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमची मुले दररोज या घाण पाण्यातूनच शाळेत ये-जा करत आहेत. ज्यामुळे त्यांना त्वचेची खाज आणि त्वचेशी संबंधित आजार जडत आहेत. विद्यार्थी उलट्या, ताप यासारख्या आजारानेही त्रस्त आहेत. मुलांची शाळेतील हजेरी कमी झाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम होत आहे. आम्हाला सुद्धा मुलांना घेण्यास आल्यावर याच गटाराच्या पाण्यातून वाट काढत मुलांना आणावे लागते.”
स्थानिक रहिवासी येणाऱ्या उग्र घाणेरड्या दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. मेलेले उंदीर, मुंग्या आणि घाण परिसरात पसरली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळा प्रशासनाने सुद्धा याबाबत मनपा आणि हिरानंदानी व्यवस्थापनाला तक्रार दिल्या आहेत. मात्र, त्यावर कारवाई कधी होणार याची वाट बघत बसण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही.
“शाळेशेजारील भागात रहिवासी संकुलातून येणाऱ्या सांडपाण्याचा पाईप आणि तिथून पुढे सांडपाणी वाहणाऱ्या पाईप मधील उंचीत तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे तिथे पाणी बाहेर निघून ते रस्त्यावर पसरत आहे. आमचे काम सुरु आहे लवकरच या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करू,”असे याबाबत हिरानंदानी प्रशासनातील व्यक्तीने नाव जाहीर न-करण्याच्या अटीवर सांगितले.
No comments yet.