सोमवार ६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रभाग क्रमांक १२२ तर्फे आयोजित एक दिवसीय मोफत लसीकरण मोहिमेत ५२५ जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. पवईतील गोखलेनगर येथील मनसे कार्यालयात या एकदिवसीय लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड – १९ या महामारीने जगाला वेठीस धरले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देशभरात निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि लोकांना जीव गमवावा लागल्याने तिसऱ्या लाटेच्या भीतीने लोक भयभीत झाले आहेत. यापासून बचावासाठी खबरदारी सोबतच कोविड लसीकरण हाच उपाय सध्या उपलब्ध आहे. मात्र गैरसमज, वेळ आणि लसीची उपलब्धता अशा अनेक कारणाने बरेच लोक लसीकरणापासून वंचित आहेत. हेच पाहता मनसे प्रभाग क्रमांक १२२ तर्फे मोफत कोविशिल्ड लसीकरण मोहिम राबवण्यात आली.
युवा नेते अमित ठाकरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनोद शिंदे आणि विभाग अध्यक्ष विश्वजित डोलम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. शाखाप्रमुख अरुण बालन, महिला शाखाप्रमुख सुजाता चव्हाण, म.न.वि.से. अध्यक्ष महेश देडे, उपविभाग अध्यक्ष शैलेश वानखेडे, सर्व उपशाखाप्रमुख आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला.
“परिसरातील शाळा आणि कार्यालयांमध्ये असलेली अनेक केंद्रे सध्या बंद झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी कोठे जायचे असा प्रश्न आहे. यामुळे अनेक नागरिकांना दुसरा डोस घेता आलेला नाही. लसीकरणासंबंधित आम्ही नागरिकांमध्ये वेळोवेळी जनजागृती करत असतो. ज्यामुळे अनेकांचे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर झाले आहेत. मात्र लस कोठे घ्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. म्हणूनच आम्ही या एकदिवसीय लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे, असे याबाबत बोलताना शाखाप्रमुख अरुण बालन यांनी सांगितले.
No comments yet.