पवई पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) मनोज गजानन भोसले (५७) यांचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी ड्युटी संपवून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाणे रेल्वे पोलीस यासंदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करून अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान एक व्यक्ती पडलेला ठाणे गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांना आढळून आला होता. तातडीने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले.
रेल्वे पोलिसांना इसमाच्या खिशातून मिळालेल्या पाकिटात मुंबई पोलिसांचे ओळखपत्र मिळून आले. यावरून ते मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे समोर येताच त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
“भोसले हे वर्षभरापूर्वी पवई येथे तैनात झाले होते. शुक्रवार, ६ जानेवारीला दिवस पाळी राखीव कर्तव्य पार पाडून संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान भोसले घरी रवाना झाले होते.” असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “७ जानेवारीला रात्री १२. १० वाजता विशेष शाखा – १ परिमंडळ ५ कार्यालयातून पोलीस हवालदार यांनी संदेश दिला की, ६ जानेवारीला रात्री ९. २० वाजताचे दरम्यान कळवा रेल्वे स्टेशन फ्लॅटफॉर्म पासून काही अंतरावर ठाण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर चालत्या लोकलमधून पडून एका इसमाचा मृत्यू झाला आहे. इसमाकडे मिळालेल्या पाकिटात मनोज भोसले या नावाचे मुंबई पोलीसचे ओळखपत्र मिळाले आहे.”
सदर माहिती मिळताच पवई पोलीस ठाण्याचे कर्तव्यावरील सपोनि दर्जाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बुधन सावंत व पोलीस निरीक्षक संतोष सावंत आणि भोसले यांचा मुलगा यांनी ठाणे सिविल रुग्णालयात जावून मयत इसम हे पोलीस उप निरीक्षक भोसले असल्याची खात्री केली.
चालत्या ट्रेनमधून त्यांचा तोल गेला असावा आणि ते खाली पडले असावेत अशी शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक चौकशीत मृत्यूमध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारली असून, या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे.
दरवर्षी लोकल अपघातात तीन ते साडेतीन हजार जणांचा मृत्यू होतो. तेवढ्याच संख्येने प्रवासी जखमी होत असतात. रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू होत असतात, त्यानंतर लोकल पकडताना पडल्याने तसेच गर्दीमुळे दारातून पडल्याने प्रवाशांचे मृत्यू होतात.
No comments yet.