पवई: २३ वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगरेचा मरोळ येथील फ्लॅटमध्ये गळा चिरून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कचरा संकलन कर्मचारी विक्रम अटवाल (३५) याने आज (शुक्रवार), ८ सप्टेंबर सकाळी अंधेरी लॉकअपमधील टॉयलेटमध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले. यासंदर्भात अपमृत्त्यू नोंद करून अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
गळा चिरून हत्या
रविवार, ३ सप्टेंबरला संध्याकाळी मरोळ येथील एनजी कॉम्प्लेक्स इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील भाड्याच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये एअर होस्टेस गळा चिरलेल्या अवस्थेत मिळून आली होती. या प्रकरणी तपास करत पवई पोलिसांनी १२ तासांच्या आत सोमवारी अटवालला अटक केली होती.
खुनाच्या आरोपाखाली त्याला मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला अधिक तपासकामी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
गुन्ह्यात वापरलेला चाकू, रक्ताचे डाग असलेले कपडे केले जप्त
पुढील तपासात गुन्हा केल्यानंतर त्याने बाथरूममध्ये स्वच्छ केलेले शस्त्र (चाकू) आणि रक्ताचे डाग असलेला गणवेश पोलिसांनी जप्त केला आहे. तीन दिवसांची कोठडी संपल्यानंतर अटवालला शुक्रवार, ८ सप्टेंबरला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
लॉकअपमधील टॉयलेटमध्ये गळफास लावून संपवले जीवन
शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंधेरी लॉकअपमधील टॉयलेटमध्ये गेलेला आरोपी बाहेर उभ्या गार्डला वारंवार आवाज देवून प्रतिसाद देत नसल्याने संशय आला. “दरवाजा तोडून आत गेले असता अटवाल शौचालयात पाण्याच्या पाईपला लटकलेला आढळला. त्याने स्वतःच्या पँटचा वापर करून स्वतःला फाशी घेतली होती,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
पत्नी व सोबतच्या आरोपींचा नोंदवणार जवाब
पोलीस पुढे म्हणाले, “गुरुवारी रात्री अटवालची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी पोलीस अंधेरीतील लॉकअपमध्ये अटवालसोबत असलेल्या इतर आरोपींचे जबाब नोंदवणार आहेत. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला काही सांगितले होते का? याबाबत पोलिस त्याच्या पत्नीचा जबाबही नोंदवणार आहेत.”
No comments yet.