पवई तलावात विचाराधीन असणाऱ्या ‘क्रोकोडाईल सफारी’ प्रकल्पावर आज, बुधवार १७ फेब्रुवारीला पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब, आमदार रमेश कोरगावकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरसेवक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आज बृहनमुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ ६मधील ‘एस’ वॉर्डातील चालू तसेच प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपआयुक्त, सह आयुक्त तसेच संबंधित अधिकारी आणि शिवसेना नगरसेवक यांच्यासमवेत बैठक पार पडली.
यावेळी झालेल्या आढावा बैठकीनंतर पवई तलावाचे सुशोभीकरण, परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यटनाच्या अनुषंगाने सोयी सुविधा निर्माण करण्यासंदर्भात विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. या वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या साहाय्याने पवई लेक येथे पर्यटकांसाठी ‘क्रोकोडाईल सफारी’ सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.
पवई तलावातील मगरींचा टॅग करून केला जाणार अभ्यास
लवकरच पवई तलावातील मगरींना तलावातील त्यांच्या दैनंदिन आणि हंगामी हालचालींचा अभ्यास करण्यासाठी ‘प्लॅटफॉर्म ट्रान्समिटर टर्मिनल्स’ (पीटीटी) बसविले जाण्याची शक्यता आहे. राज्य वन विभागाने भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांना तलावात मगर सफारी संदर्भात पत्र लिहिले होते. भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्य वन विभागाला सुचविलेल्या उपायांपैकी हा एक आहे.
डब्ल्यूआयआयने पवई तलावावर मगर सफारी सुरू करण्यापूर्वी काही उपाय सुचविले आहेत. यामध्ये मगरींचे टॅगिंग महत्त्वाचे आहे. सफारी सुरु करण्यापूर्वी पर्यटकांसाठी परिसर, जास्त प्रमाणात मगरींचा वावर असणारी ठिकाणे, पर्यटक पाण्याच्या संपर्कात येऊ नयेत म्हणून तशा प्रकारच्या बोटींचे निर्माण या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे. स्पीड बोट, लाइफ जॅकेट्स, प्रथमोपचार किट, मगर पकडण्यासाठी आणि हाताळण्यासाठी किट इत्यादींसह मगर मॉनिटरींग-कम-टुरिस्ट सेफ्टी ठिकाण स्थापित करणे आवश्यक आहे. एक किंवा दोन वॉच टॉवर्स, नियोजनासाठी महत्वपूर्ण असलेल्या तलावातील मगरांची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी जलद मूल्यांकन अभ्यासाची आवश्यकता आहे. असे उपाय सुचवले असून, देखरेखीसाठी आणि मानव-मगर संघर्ष टाळण्यासाठी काही मगरींना पीटीटी सह टॅग केले जाऊ शकते.
डब्ल्यूआयआयने तलावाच्या जैवविविधता आणि पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी देखील उपाय सुचविले आहेत. सर्व सांडपाणी तलावात सोडण्यापूर्वी प्रक्रिया करावी. तलावाच्या आजूबाजूच्या परिसराला प्लास्टिक मुक्त झोन बनवावे. वेळोवेळी जलपर्णी काढणे आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास निवडलेल्या ठिकाणी डीसिल्टिंग, संपूर्ण तलाव हा कचरा आणि प्रदूषण मुक्त बनवायला हवा. डब्ल्यूआयआयने असेही म्हटले आहे की ते सरकारच्या पाठिंब्याने जलद मूल्यांकन अभ्यास करण्यास तयार आहेत.
No comments yet.