एल अँड टी एमराल्ड आयल इमारतीत भटक्या कुत्र्यावर क्रूरता करणाऱ्या सुरक्षा रक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल

प्राणीमित्र कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर पवई पोलिसांकडून गुन्हा नोंद

कुत्र्याला मारहाण करणारा सुरक्षा रक्षक

पवईतील एल अँड टी एमराल्ड आयल इमारतीत एका भटक्या कुत्र्याला मारहाण करत क्रूरता दर्शवणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात अखेर २३ ऑगस्टला पवई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पवई पोलिस याचा अधिक तपास करत असून, मुंबईतून पसार झालेल्या आरोपी सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहेत.

प्राणीमित्र, प्राणी हक्क कार्यकर्ते, भारतीय पशु कल्याण मंडळाने नियुक्त केलेले मुंबईचे मानद जिल्हा प्राणी कल्याण अधिकारी आणि पॉज मुंबईचे संस्थापक सुनिश सुब्रामण्यम कुंजू यांनी पवई पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारी आणि पुराव्यानंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पवईतील एका इमारतीच्या पार्किंगच्या भागात सुरक्षारक्षक एका भटक्या कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर व इतर सोशल माध्यमातून व्हायरल होत होता.

‘मारहाण करतानाचा हा व्हिडिओबाबत आम्ही माहिती मिळवली असता, ही घटना १८ जुलै २०१९ रोजी घडली आहे. सोसायटीत राहणाऱ्या काही सदस्यांच्या सूचनेवरून सुरक्षारक्षकाने “फिली” नावाच्या एका गरीब भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. कारण म्हणजे त्या प्राण्याने पार्किंगमध्ये आश्रय घेतला होता’ असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना सुनिष कुंजू यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘एखाद्या भटक्या जनावराला शिवीगाळ करणे, मारहाण करणे, लाथ मारणे, ओव्हरराइड करणे, छळ करणे, कोणत्याही प्राण्यांना अनावश्यक वेदना देणे किंवा त्रास देणे हे क्रौर्य १९६० च्या प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम ११ (१) (अ), भारतीय दंड संहिता आणि जनावरांच्या कल्याणासाठी बनवलेल्या इतर कायद्यानुसार गुन्हा आहे.’

या संदर्भात गुरुवारी कुंजू यांच्यातर्फे पवई पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आल्यानंतर पवई पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ठुंबरे आणि कुंजू यांनी घटनास्थळाला भेट दिली. ‘आम्ही तेथील लोकांचे जवाब नोंदवत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्राण्यासोबतच्या क्रूर कृत्याची सत्यता पडताळणी केली आहे’, असे याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले.

पवई पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड संहितेचे कलम ४२९ सह १९६० चा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम ११ (१) (अ) अनुसार गुन्हा नोंद केला आहे.

या घटनेनंतर सुरक्षारक्षक एजेन्सीने त्या सुरक्षा रक्षकाला काढून टाकले असून, सध्या तो मुंबईच्या बाहेर निघून गेला आहे. आम्ही त्याचा सध्याचा पत्ता मिळवत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल,’ असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!