तरुण पिढीला सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण, तरुणी त्याच्या आहारी गेली आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा नवीन नाहीत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य; एक वाकडे पाऊल आयुष्य कसे उध्वस्त करू शकते याची जाणीव करून देण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून, “जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिना”चे औचित्य साधत आज, (०४ जुलै) “अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई विभागाचे गुप्तचर अधिकारी कुलभूषण सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पावसाळा आणि जनजागृती संदेश याचे मिलन करतानाच अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम तसेच नशामुक्तीचे संदेश छत्र्यांवर लिहून त्यांचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले.
पवई इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शेरली उदयकुमार, प्राथमिक विभागाच्या मुख्याद्यापिका लता प्रसाद पिल्लाई, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भावना मॅडम, शिक्षक, व्यवस्थापक उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालयातील तरूण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जावून आपले आयुष्य उध्वस्त करून घेवू नये म्हणून पोलिसांसह, विविध स्वयंसेवी संस्था जनजागृती मोहिम राबवत असतात. मात्र अशा कार्यक्रमात क्वचितच विद्यार्थ्यांचा सहभाग पहावयास मिळतो. तारुण्यात पदार्पण करत असताना आकर्षणापोटी अनेक मुले अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात, म्हणून विद्यार्थी दशेतच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून पाठीमागील ५ वर्षापासून पवई इंग्लिश हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी अशा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करत असते.
कुलभूषण सिंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नशाखोरीच्या विळख्याबाबत आपले अनुभव सांगितले. केवळ जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांची चव चाखणारे आज त्याच्या गर्ततेत आपसूकच सापडले आहेत. असे लोक आपल्यासह आपल्या संपूर्ण परिवाराचे आयुष्य कसे उध्वस्त करतात याची माहिती दिली. अंमली पदार्थाच्या नशेच्या आहारी गेलेल्या मुलांच्यात दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना याबाबतही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अंमलीपदार्थ विरोधी कायद्याचे विश्लेषण देताना यातील अपराध्यांना १० ते २० वर्ष शिक्षा आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप होण्याची शक्यता सुद्धा असल्याचे सांगत कायद्यातील कठोरतेची सुद्धा विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
“शाळेत सर्व स्थरातून शिक्षणासाठी मुले येत असतात. आसपास अंमलीपदार्थ सेवनाच्या गोष्टी घडल्यावर किंवा सुरुवातीला सोबतीला मज्जा म्हणून केला गेलेला प्रयोग नंतर जीवावर बेतू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये दुष्परिणामाबाबत जनजागृती व्हावी यासाठी आमच्या शाळेत ‘से नो टू ड्रग्स’ या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते,” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शेरली उदयकुमार यांनी सांगितले.
No comments yet.