@प्रतिक कांबळे: देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सरकार व अनेक सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्न आणि धान्याचे वाटप केले जात आहे. याच सेवेत आपला खारीचा वाटा उचलत पवईस्थित आशा फॉर एज्युकेशन मुंबईतर्फे पवईतील २०० गरजूंना लॉकडाऊनच्या या काळात प्रत्येक आठवड्याला मोफत तांदूळ, ५ किलो पीठ, २ किलो डाळ, २ किलो साखर, १ लीटर तेल अशा गरजेच्या अन्नधान्य सामानाचे वाटप केले जाणार आहे.
रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबातील एकही मुलगा अशिक्षित राहू नये म्हणून काम करणाऱ्या या संस्थेने आता या घरातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून आपला मदतीचा हात पुढे केला आहे. “यासाठी त्यांना योग्य तो अन्नपुरवठा व्हावा म्हणून संस्थेची संपूर्ण टीम अविरत झटत आहे,” असे संस्थेच्या समन्वयक डॉ स्मिता पुनयानी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूनी देशात प्रवेश करत या विषाणूंचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. यानंतर संपूर्ण देश घरातच अडकून असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना कसेबसे एक वेळच्या जेवणावर पोटाची भूक भागवावी लागत आहे. समाजातील बरेच लोक, समाजसेवक, स्वयंसेवी संस्था यासाठी पुढे आल्या आहेत. मात्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला पोहचणे शक्य नसल्याने आशा फॉर एज्युकेशन ने यात सहभाग घेत आपल्या परीने जेव्हढ्या कुटुंबाना मदत करता येईल त्या कुटुंबाना मदतीचा हात देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.