आवर्तनच्या पाठपुराव्याला यश, एसएम शेट्टी शाळेजवळील रस्त्याची दुरुस्ती

काही महिन्यांपूर्वीच बनवण्यात आलेल्या एस एम शेट्टी शाळेजवळील रोडवर सुरुवातीच्या पावसातच खड्डे पडल्याने रस्त्याची अगदी चाळण झाली होती. याबाबत ‘आवर्तन पवई’ने पालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता अखेर दुरुस्त करण्यात आला आहे.

एसएम शेट्टी स्कूलमार्गे असणारा रोड हा चांदिवली आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. दररोज या मार्गावरून हजोरोंच्या संखेने गाड्यांचा प्रवास होत असतो. विशेष म्हणजे याच मार्गाने दिवसभर विविध माध्यमातून शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असतात. मात्र काही महिन्यांपूर्वीच बनवण्यात आलेल्या या मार्गावर यावर्षीच्या सुरुवातीच्या पावसानेच भलेमोठे खड्डे निर्माण झाले होते.

वरून पडणारा सततचा पाऊस आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे काही दिवसातच या खड्यांचे अक्षरशः चरींमध्ये रुपांतर झाले होते. या मार्गावरून येथील वळणांवर तर वाहनांची चाके फूट फूटभर आत जात असल्याने वाहनचालक वाहन वाचवण्यासाठी विरुद्ध वाहिनीवरून गाडी घेवून जात होते. एकाच मार्गिकेवर दोन्ही बाजूचा दबाव वाढल्याने मोठी वाहतूक कोंडी होत होती. शाळेच्या वेळात तर वाहतूक कोंडी होत लांबच लांब रांगा  लागत होत्या. काही विद्यार्थी रस्ता ओलांडताना या भागात पडून जखमी देखील झाले होते.

या प्रश्ना संदर्भात आवर्तन पवईने पालिका प्रशासन आणि लोक प्रतिनिधी यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करून तसेच प्रत्यक्ष भेटून तक्रार केली होती. तसेच याचा सतत पाठपुरावा देखील करत होते. याचीच दखल घेत पावसाचा जोर ओसरताच डांबर टाकून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. यामुळे शाळकरी मुलांसोबतच आता इतर प्रवाशांचा प्रवास देखील सुखकर झाला आहे.

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!