आयआयटी, पवई येथील ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी भूमिका किसन पात्रे हिने राष्ट्रीय पातळीवर जम्परोप स्पर्धेत रौप्यपदक मिळवत पवईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या कामगिरीनंतर राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणाऱ्या यादीमध्ये आता तिचेही नाव कोरले आहे.
२०२१मध्ये उदयपुर राजस्थान येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धा २०२१मध्ये डोंबिवली येथील १० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १३ सुवर्ण तर ७ रौप्य पदके पटकावली होती. २०२२मध्ये भूमिकाने मिळवलेल्या रौप्य पदकाच्या रुपात हा बहुमान पवईला प्राप्त झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे पवईतील ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. येथील क्रीडा शिक्षक संतोष वाळुंज यांच्या प्रेरणादायक मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवत आहेत. नुकत्याच नाशिक येथील सातपूर येथील कालिका मंदिर येथे पार पडलेल्या अठराव्या राष्ट्रीय उपकनिष्ठ जम्परोप स्पर्धा-२०२२मध्ये ज्ञान मंदिर शाळेत नववीत शिकणाऱ्या भूमिका पात्रे हिने रौप्यपदक पटकावित राष्ट्रीय चँम्पियन शिपमध्ये पदक प्राप्त केले आहे.
भूमिकाने मिळविलेल्या या यशा बद्दल ज्ञानमंदीर विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी वर्ग व संस्था पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला असून, संस्था कार्यवाहक राणे सर, त्रिपाठी, उपाध्यक्ष गाडे, सभासद कोटीया, कुंदा मँडम, बागायतकर, भावसार व पर्यवक्षक संजय भंगाळे यांनी भूमिका पात्रे व वाळुंज सर यांचा सन्मान करत विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशाबद्दल केवळ पवईमधूनच नव्हे तर महाराष्ट्रभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments yet.