आयआयटी, पवई येथील एका डबक्यात पडून एका ३ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी १०.३० वाजता आयआयटी कॅम्पसमध्ये घडली. सार्थक चंद्रकांत येवले असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत.
आयआयटी तंत्रज्ञान संस्थेत काम करणारे व इंदिरानगर येथील रहिवाशी विकास कमलापुरकर हे आपला भाचा सार्थक याला शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या सोबत आपल्या कामाच्या ठिकाणी आयआयटी कॅम्पस येथे शुक्रवारी सकाळी घेवून गेले होते. तेथे एका मित्राचा भविष्य निर्वाह निधीचा फॉर्म भरण्यात विकास आणि त्यांचा मित्र व्यस्त असताना सार्थक हा खेळता खेळता अचानक गायब झाला. त्याची आसपास सगळीकडे शोधाशोध करण्यात आली, मात्र तो कुठेच आढळून आला नाही. अखेर जलवायू गेस्ट हाउस जवळील एका डबक्यात पाण्यावर तरंगत असताना तो आढळून आला.
“त्याला त्वरित आयआयटी कॅम्पसमधील रुग्णालयात नेण्यात आले, तिथे असणारे डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी त्याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले” असे पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक बनसोडे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.