भारतीय चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या ९९.६५ लाख रुपयांच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्या एका व्यावसायिकाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. केशव मनोहर कोरगावकर असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. रक्कम बदलून घेण्यासाठी पवईमध्ये आला असताना पवई पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
नोटबंदीनंतर पैसे बदलून घेण्याचा काळ संपला असून, आजही या १६ ते १८ टक्क्याच्या दराने जुन्या नोटा बदलून देण्याचे काम अनेक दलाल चोरी-छुप्या मार्गाने करत आहेत.
“रविवारी, १८ एप्रिलला काही इसम जुन्या नोटा बदलण्यासाठी पवई परिसरात येणार असल्याची माहिती आम्हाला खास खबऱ्याकडून मिळाली होती. ज्याच्या आधारावर आम्ही हिरानंदानीजवळ, हिरापन्ना मॉल – पंचरत्न इमारत भागात असणाऱ्या मोकळ्या मैदानात साध्या वेशात पाळत ठेवून बसलो असताना एक इसम रिक्षातून तिथे आला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे जुन्या नोटा आढळून आल्यानंतर आम्ही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “झडतीत त्याच्याकडून चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा मिळून ९९.६५ लाखाची रक्कम मिळून आली आहे. गोवा आणि पुणे भागात त्याचे रेसॉर्टस असून, संपूर्ण रक्कम त्याची स्वतःची असल्याची त्याने कबुली दिली आहे. पुणे येथून मुंबईमध्ये तो ही रक्कम बदलून घेण्यासाठी आला होता.”
केशवला ही रक्कम कोण बदलून देणार होता? त्याच्याकडे ही रक्कम कशी आली? पवईमध्ये नोटा बदलून देणारे कोणी दलाल राहतात का? याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
“आम्ही आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे” असे याबाबत पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश काळे, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस नाईक संतोष देसाई, पोलीस नाईक जगताप, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई बांधकर, पोलीस शिपाई गलांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
No comments yet.