पूर्व आणि पश्चिम उपनगर यांना जोडणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) ते गांधीनगर या मार्गावर रस्त्यावर गाडीतील ऑईल पडले आहे. त्यामुळे अतिमहत्वाच्या कामासाठी किंवा इतर कारणांनी बाहेर पडलेल्या वाहनचालकांनी या भागातून प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी. मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरु आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ६.४० च्या सुमारास जेविएलआरवर ऑईल पडले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दल तिथे हजर झाले असता गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ऑईल पडले असल्याचे आढळून आले. गणेशनगर ते पवई प्लाझा या भागात मेट्रोच्या कामासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सना लागून असणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात ऑईल पडले आहे. येथून पुढील भागात ठिकठिकाणी ऑईल पडल्याचे समोर येत आहे.
“या मार्गावरून जाणारया एखाद्या वाहनातून गळती होत हे ऑईल रस्त्यावर पडले असण्याची शक्यता आहे. आम्ही त्वरित बॅरिकेड्स लावत सदर मार्गिका बंद केली आहे. तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने आम्ही पडलेल्या ऑईलवर माती टाकत आहोत” असे पवई पोलिसांनी सांगितले.
“ऑईल सांडलेल्या गणेशनगर येथील भागात एक मोठे वळण आहे. त्यातच अंधार होत असल्यामुळे पुढील भागात रस्त्यावर ऑईल पडले असल्याचे वाहनचालकाच्या त्वरित लक्षात येणार नाही. ऑईल पडलेला भाग हा खूप लांबपर्यंत असल्याने वाहनचालकांनी या मार्गाने जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
सध्या लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी असली तरी अत्यावश्यक आणि इतर कामासाठी नाविलाजास्तव बाहेर पडलेल्या वाहनचालकांनी या संपूर्ण भागात वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आणि अग्निशमन दलातर्फे करण्यात आले आहे.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.