गुन्हा केल्यानंतर फैजलने आपली स्पोर्ट्स बाईक पवई येथे सोडून दिली होती.
जवळपास एक वर्ष आणि चार महिने प्रयत्न केल्यानंतर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यांनी त्याच्या मागे पथके लावली होती पण तो कधीच घरात मिळून येत नव्हता.
त्याला पकडल्यामुळे पोलिसांना त्याचे एवढे दिवस न पकडले जाण्याचे रहस्य देखील समोर आले आहे. त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याच्या घाटकोपर झोपडपट्टीतील घराजवळच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले होते.
फैजल अली उर्फ अलीमामा शेख उर्फ इराणी (२८) असे या आरोपीचे नाव असून, याचे एक खबऱ्यांचे नेटवर्क देखील आहे. जे त्याला पोलिसांची परिसरातील हालचालीची माहिती देत असते. परंतु यावेळी पोलिसांनी वेगवान कारवाई केल्याने तो पकडला गेला.
मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात पाठीमागील आठ वर्षात केलेल्या ५६ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस फैजलचा शोध घेत होते. मार्च महिन्यात ६० वर्षीय उर्मिला मिश्रा यांच्या २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लुटल्याचा संशय आल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक त्याचा शोध घेत होते.
गुन्हा केल्यानंतर फैजलने आपली स्पोर्ट्स बाईक पवई येथे सोडून दिली होती. “तो योग्य संधी पाहून ती मोटारसायकल तेथून घेवून जाण्याची वाट पाहत होता. त्याने एका मेकॅनिकला गाठून त्याला बाईक दाखवली आणि गॅरेजमध्ये नेण्यास सांगितले. तो काही अंतरावर थांबून लक्ष ठेवून होता. पोलिसांनी मोटारसायकल घेवून जाताना मेकॅनिकला पकडल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. मेकॅनिकने त्याचे नाव आणि ओळख सांगितल्याने त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला,” पोलीस म्हणाले.
पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ५६ गुन्ह्यांची भक्कम माहिती जमा करत पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यश पालवे आणि पोलीस हवालदार शंकर काळे, हणमंत पुजारी, नितीन नलावडे, शिवा पवार, प्रदिप चव्हाण आणि अमोल पवार यांच्या पथकाने देखरेख करत माहिती मिळताच फैजलला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.
फैजलला पळून जाण्याची संधी देण्यासाठी त्याच्या कुटुंबातील आठ महिलांनी पथकावर हल्ला चढवला, पण त्या पोलिसांचा निर्धार मोडू शकल्या नाहीत.
याबाबत बोलताना पालवे म्हणाले, “शेखच्या विरोधात चार अजामीनपात्र वॉरंट आहेत. नारपोली पोलिस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यापासून वाचण्यासाठी त्याने सीसीटीव्ही लावले होते आणि त्याच्या घराजवळ पोलिसांच्या उपस्थितीबद्दल त्याला कळवण्यासाठी सात ते आठ लोकांचे जाळे त्याच्यासाठी काम करत होते. पोलीस त्याला पकडण्यास येताच त्याच्या कुटुंबातील महिलांसोबतच, मुलांना पोलिसांवर दगडफेक करण्यास सांगितले जाते.”
No comments yet.