
भारतीय सैन्यदलातील जवान लान्स नायक विजय कोकरे यांचे पार्थिव लष्करी सन्मानासह घेवून जाताना. चौकटीत लान्स नायक विजय कोकरे कर्तव्यावर असताना.
पवईकर, २७ वर्षीय लान्स नाईक विजय कोकरे यांचा २० जुलै रोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या हवाई संरक्षण युनिटमध्ये तैनात होते. शनिवारी (२२ जुलै) पहाटे पवईतील चैतन्यनगर येथे या वीरपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भर पावसात हजारो लोकांनी गर्दी केली होती.
लान्स नायक विजय कोकरे हे मूळचे महाराष्ट्रातील सातारा येथील वासरवाडी येथील असून, पवईतील इंदिरानगर भागात आपल्या पालकांसह राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. विजय यांनी आपले प्रारंभिक शिक्षण पवई येथील ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण विक्रोळी येथील विकास महाविद्यालयात घेतले.
शिक्षण घेत असताना २०१७ मध्ये त्यांचे देशसेवेचे स्वप्न त्यांना भारतीय सैन्यात घेऊन गेले. भरती झाल्यावर त्यांना आर्मी एअर डिफेन्समध्ये नियुक्ती देण्यात आली. सध्या ते लान्स नाईक या पदावर कार्यरत होते. आपल्या सुट्ट्या संपवून काहीच दिवसांपूर्वी ते आपल्या कर्तव्यावर परतले होते.

लान्स नायक विजय कोकरे यांना अंतिम निरोप देताना त्यांचा परिवार
लष्कराने कुटुंबाला दिलेल्या माहितीनुसार, विजय २० जुलैला श्रीनगर येथे कर्तव्यावर असताना अचानक खाली कोसळले आणि उपस्थित जवानांनी त्यांना तत्काळ लष्कर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार केले, मात्र १ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराचा झटक्याने विजय यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती लष्कराने त्यांच्या कुटुंबाला दिली. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अधिकारी शोधत आहेत.
“विजय हा प्रामाणिक, दयाळू होता. आपल्या सामाजिक कार्यातून आणि समाजासाठी निस्वार्थ सेवेतून त्याने अनेक तरुणांना प्रेरित केले होते. पवईतील अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत त्याने काम केले होते. भारतीय सैन्यदलात जाण्याचे आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याचे त्याचे स्वप्न होते आणि तो ते जगत होता. तो एक शूर सैनिक होता आणि राहील,” असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
२२ जुलैला मोठ्या सन्मानाने त्यांचे पार्थिव पवई येथे आणण्यात आले. पवईच्या चैतन्यनगर भाजी मंडई भागात या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून मित्र, कुटुंबीय यांच्यासह हजारोच्या संख्येने लोक जमले होते. त्यांच्या शौर्याच्या आणि अमरतेच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमत अखेर लष्करी सन्मानासह लान्स नायक विजय कोकरे यांच्यावर टागोर नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments yet.