हिरानंदानीत घरफोडी करणाऱ्या स्पायडर टोळीला अटक

पवईतील हिरानंदानी भागात इमारतीच्या पाईपवरून चढून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या स्पायडर टोळीला अवघ्या आठवड्याभरात पकडण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या टोळीच्या अटकेमुळे पवईसह मुंबईतील विविध भागातील घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अदनान मोहंमद हुसैन खान (वय २० वर्षे), भावेश उर्फ लालु प्रभाकर सिंग चौहान (वय २८ वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, गुन्ह्यात एक १४ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व नालासोपारा येथे राहत असून, रात्री मुंबईच्या विविध भागात फिरून चोऱ्या करत असत.

40 वर्षीय फिर्यादी हे अमेरिकन नागरिक असून, पाठीमागील ७ महिन्यांपासून हिरानंदानी गार्डन्स येथील अडोनिया इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत आहेत.

५ ऑगस्टला सर्व कुटुंब झोपेत असताना पहाटे कोणीतरी अज्ञात इसमाने घरात घुसून घरातील २ आय फोन, ऍपल कंपनीचे २, टीसॉट कंपनीचे १, आणि फॉसिल कंपनीचे १ अशी एकुण ४ स्मार्ट वॉचेस (मनगटी घड्याळे), एक ऍपल आय पॅड, बिट प्रो इअर बर्ड व म्युझिक सिस्टीम, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची इअर रिंग व अंगठी आणि फिर्यादीची नातेवाईकाचे कोलंबिया देशाचे पारपत्र (पासपोर्ट) अशी एकूण ३ लाख २३ हजार रुपये किमतीची मालमत्ता चोरट्यांनी चोरल्याची तक्रार जॉन यांनी पवई पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

अटक आरोपी डावीकडे – अदनान मोहंमद हुसैन खान (वय २० वर्षे), उजवीकडे – भावेश उर्फ लालु प्रभाकर सिंग चौहान (वय २८ वर्षे)

“गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळी व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यानचे दोन संशयीत इसमांचे फुटेज प्राप्त झाले होते,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले.

पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) विनोद लाड, पो.ह. पाचपांडे, पो.शि. धुरी, पो.शि. भोये, पो.शि. राठोड व म.पो. शि. शीतल लाड यांच्या पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

“तपासात आरोपी हे इमारतीच्या गॅस पाईपलाईनच्या सहाय्याने पाचव्या मजल्यावर चढून किचनच्या खिडकीतून घरात प्रवेश करून चोरी करून परत त्याच मार्गाने उतरून घरातून पसार झाल्याचे समोर आले होते”, असे सपोनि विनोद लाड यांनी आवर्तन पवईला सांगितले.

ते पुढे म्हणाले, “सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेल्याने आढळले. त्या अनुषंगाने वेस्टर्न रेल्वेचे स्टेशन आणि इतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ते नालासोपारा येथे उतरल्याचे समोर आले.”

माहितीच्या आधारे पवई पोलिसांच्या पथकाने नालासोपारा परिसरात आरोपींचा शोध सुरु करत परिसरात खबरयांचे जाळे उभे केले. “आरोपींची ओळख होताच आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे त्यांना समजताच ते पळून जाण्याची शक्यता पाहता स्थानिक नागरिक असल्याचे भासवत आम्ही परिसरात पाळत ठेवून होतो. तांत्रिक माहिती आणि खबऱ्याच्या माहितीच्या आधारावर आम्ही तिन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेतले.” असे पवई पोलिसांनी सांगितले.

“आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून आम्ही चोरीस गेलेले आय फोन, फॉसिल कंपनीचे घड्याळ, आय पॅड, इअर बर्ड व म्युझिक सिस्टीम असा  एकूण २.२० लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नमुद तिन्ही आरोपी हे आचोळे पोलीस ठाणे, पालघर येथील अभिलेखावरील आहेत.” असे लाड यांनी सांगितले.

सदर गुन्ह्यात नमुद अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता १४ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्या अजून काही गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली असून, त्या अनुषंगाने देखील पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!