वादग्रस्त पवई सायकल ट्रॅक प्रकल्पाबाबत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांच्या गटांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे “सार्वजनिक सभे”बाबत तक्रार केली आहे. चहल यांना लिहिलेल्या पत्रात, रहिवाशांनी तक्रार केली आहे की ‘पवई तलावाचे पुनरुज्जीवन” या विषयावर २७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु केवळ काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आणि अधिकारी त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.
याला नकार देतानाच पालिकेने म्हटले आहे की, त्यांनी कोणतीही सार्वजनिक सभा घेतली नाही आणि २७ नोव्हेंबर रोजीची सभा कदाचित अर्कीटेक्त पंकज जोशी यांनी प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून आयोजित केली असावी.
“२७ नोव्हेंबर रोजी गोपाल शर्मा इंटरनॅशनल स्कूल, पवई येथे एक बैठक झाली होती. या बैठकीत पवई तलाव किनारी बनणाऱ्या सायकल ट्रॅक बांधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, त्यामुळे ती ‘सार्वजनिक सभा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात जर ती सार्वजनिक सभा होती तर शहराच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर असणाऱ्या या सभेबाबत नोटिसा देणे आवश्यक होते. ती दिली नसल्याने या बैठकीला मोजकी उपस्थिती होती आणि यावेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना आर्किटेक्ट पंकज जोशी यांनी दिलेली उत्तरे अत्यंत असमाधानकारक आणि काही वेळा अपमानास्पद होती,” असे कार्यकर्त्या पामेला चीमा यांनी चहल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
“जाहीर सभा आयोजित करून प्रकल्पाचे तपशीलवार आराखडे उघड केले पाहिजेत आणि विस्तृतपणे चर्चा केली गेली पाहिजे. मी त्या बैठकीला उपस्थित राहिलो, परंतु मीटिंगचे आयोजन करणाऱ्यांनी प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत,” असे सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
ते पुढे म्हणाले “नागरिकांच्या प्रश्नांना टोलवा-टोलवीची उत्तरे देण्यात आली. सभे दरम्यान नागरिकांनी रेकॉर्ड केलेले व्हिडीओ डिलीट करण्यात आले.”
“आम्हाला कोणत्याही जाहीर सभांची माहिती नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे. पंकज जोशी हे या प्रकल्पाचे अर्कीटेक्त आहेत आणि त्या क्षमतेनुसार ते लोकांशी संवाद साधू शकतात. कोणतीही सार्वजनिक सूचना न दिल्यास, ती सार्वजनिक सभा होऊ शकत नाही,” पी वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) म्हणाले.
आयआयटीच्या दोन पीएचडी विद्यार्थ्यांनी सायकल ट्रॅकसाठी तलावाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पवई तलावात प्रस्तावित सायकलिंग आणि जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या कामाला ३१ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.
No comments yet.