मुख्यमंत्र्यांनी आरे कार शेड प्रकरणात सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असल्याने आम्हाला आशा आहे की ते आमच्या भूमिगत मेट्रोच्या मागणीकडे सुद्धा लक्ष देतील. – पवईकर
@प्रमोद चव्हाण
मेट्रो – ६ (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी पवईकरांनी केली आहे. सोमवारी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे भूमिगत मेट्रोच्या मागणी आणि भेटी संदर्भातले पत्र सादर केले. मेट्रो – ६ हा १४.५ किमी लांबीचा कॉरिडोर आहे, जो लोखंडवाला येथील स्वामी समर्थनगर ते पूर्व धृतगती मार्ग विक्रोळी पर्यंत आहे.
राज्य सरकारने आखलेल्या मार्गाऐवजी मेट्रो – ६ साठी पर्यायी भूमिगत कॉरिडोरची मागणी या मार्गावर असणाऱ्या स्थानिकांकडून केली जात आहे. प्रस्तावित मार्गामुळे आधीच जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) जास्त गर्दी असते, त्यात आणखी भर पडेल असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात रहिवाशांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. पाठीमागील सरकारने आणखी चांगल्या उपलब्ध पर्यायाची माहिती असून सुद्धा, न जुमानता त्यांच्या पूर्वनियोजित योजना राबवल्या आहेत.
मेट्रो – ६ भूमिगत करण्याची मागणीची मोहीम राबविणाऱ्या पवईकर सोनाली मिश्रा याबाबत बोलताना म्हणाल्या, “सोमवारी आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाला आमच्या मागणीचे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विनंती पत्र दिले आहे. आम्ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सुद्धा पत्रव्यवहार केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरे कार शेड प्रकरणात सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला असल्याने आम्हाला आशा आहे की ते आमच्या भूमिगत मेट्रोच्या मागणीकडे सुद्धा लक्ष देतील.”
मेट्रो – ६ कॉरिडॉर भूमिगत मेट्रोची मागणी करणाऱ्या गटाने सुचविल्याप्रमाणे पर्यायी मार्ग संपूर्ण भूमिगत मेट्रो – ३ कॉरिडोर (कुलाबा-सिप्झ) पासून ६ किमी लांबीचा विस्तार आहे. सुचवलेला मार्ग मरोळनाका पासून सुरू होत साकीविहार रोड मार्गे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर विक्रोळीला पोहोचतो. “आम्ही लवकरच पुन्हा एमएमआरडीएकडे सुद्धा याचा पाठपुरावा करणार आहोत,” असे नागरिकांकडून सांगण्यात आले.
“रविवार १९ जानेवारीपासून आम्ही पवईतील विविध भागात भूमिगत मेट्रोच्या समर्थनात सह्यांची मोहीम राबवणार आहोत. येणाऱ्या रविवारी हिरानंदानी आणि चांदिवली डी-मार्टजवळ, रहेजा विहार अशा विविध ठिकाणी एकसाथ आम्ही ही मोहिम राबवणार आहे. संध्याकाळी ५ ते ६.३० यावेळेत या मागणीच्या समर्थनात असणाऱ्या नागरिकांनी सहभाग घ्यावा” असेही याबाबत बोलताना सोनाली मिश्रा यांनी सांगितले.
No comments yet.