ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी असलेल्या वेबसाईटवर सामान विक्री करताना गुगल पेच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्यासाठी आपला गुगल पे क्युआर कोड देताच ठगाने तिच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारला आहे. आपल्या खात्यातील पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच तिने याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पवईतील एका कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असलेली तेजस्विनी ही मैत्रीणीसोबत पवईतील बीएसएनएल कॉलनीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहते. पनवेल येथील तिच्या मूळ घराचे जुने फर्निचर तिने विक्रीसाठी ऑनलाईन खरेदी विक्री चालणाऱ्या साईटवर विक्रीसाठी टाकले होते.
गुरुवारी ५ सप्टेंबरला दुपारी साडेचारच्या सुमारास तिला एका नंबरवरुन कॉल आला. कॉल करणार्या इसमाने आपले नाव श्रीकांत असल्याचे सांगून, विक्रीसाठी टाकलेले फर्निचर विकत घ्यायची इच्छा दर्शवली.
दोघांच्या चर्चेतील वाटाघाटीनंतर सहा हजार रुपयांना विक्रीचा व्यवहार ठरला. पैसे आताच ऑनलाईन पाठवतो म्हणत श्रीकांतने तरुणीला गुगल पे अॅपचा क्युआर कोड त्याच्या व्हॉटसअॅप नंबरवर पाठविण्यास सांगितले.
मी क्युआर कोड पाठविल्यानंतर त्याने सामान घेऊन जाण्यासाठी पत्ता मागून गुगल पे वर ४ हजार ९९२ रुपयांची रिक्वेस्ट पाठविली. रिक्वेस्ट स्विकारली, परंतू व्यवहार पूर्ण झाला नसल्याचे त्याने मला सांगितले आणि पून्हा ४ हजार ९९२ रुपयांची रिक्वेस्ट पाठविली. मी रिक्वेस्ट स्विकारताच माझ्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी मोबाईलवर खात्यातून पैसे गेल्याचे मॅसेज आले. असे तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
तरुणीने त्यानंतर श्रीकांतला कॉल करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र त्याने कॉल उचलणे बंद केले. तिने मित्राच्या मोबाईलवरुन कॉल केला असता, श्रीकांतने तो कॉल उचलत उडावा-उडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तरुणीने पवई पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
No comments yet.