पोलीस शिपायाने ५० फुटांचा डोंगर चढून वाचवला तरुणाचा जीव

nevase५० फुट उंचीवर डोंगरावर चढून जीव देण्याच्या तयारीत असणाऱ्या नवाब मन्सुरी (३५) या तरुणाशी वाटाघाटी करत, कोणत्याही सुरक्षा साधना शिवाय तेवढा डोंगर चढून त्या तरुणाचे जीव वाचवण्याचे शौर्य साकीनाका पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या सुहास अशोक नेवसे यांनी केले आहे.

बुधवारी संध्याकाळी साकीनाका पोलीस ठाण्याला मुख्य नियंत्रण कक्षातून संदेश मिळाला की, संघर्षनगरच्या बाजूला असणाऱ्या डोंगराळ भागातून एक तरुण आपला जीव देण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे आणि पोलीस शिपाई नेवसे आपल्या टिम सोबत तेथे पोहचले तेव्हा तरुण कडेवरून जीव देण्याच्या तयारीतच होता. जे पाहता कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या नेवसे यांनी अग्निशमन दलास येण्यास वेळ लागेल तेव्हा मला वरती चढायची अनुमती द्या अशी वरिष्ठांकडे मागणी केली.

“अनुमतीने मी अनवाणी पायाने आपला मार्ग बनवत त्याच्या जवळ गेलो आणि त्याच्याशी संवाद साधत त्याची अडचण समजून घेवून त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्याला शांत करून खाली उतरवले” असे यावेळी माध्यमांशी बोलताना नेवसे यांनी सांगितले.

“मूळचा राजस्थानचा असणारा मन्सुरी हा एका छोट्या हॉटेलात काम करतो. व्यवस्थित काम हाती नसल्याने आणि कुटुंबाचे पालन पोषण आणि आपला खर्च भागवण्याची कसरत करताना आर्थिक चणचणीमुळे तो हताश झाला होता. बुधवारी दारूच्या नशेत त्याने डोंगरावर चढून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नेवसे याने सजगता आणि प्रसंगावधान राखत शौर्याने सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य सार्थ करून दाखवले आहे” असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या ट्वीटरसह संपूर्ण मुंबईकरांकडून नेवसे यांच्यावर त्यांच्या या शौर्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!