पवईतील तुंगागाव, एल-अँड-टी गेट क्रमांक ५ समोरील परिसरात असणाऱ्या जुहूर पॅलेस इमारतीत घुसून दोन अज्ञात चोरट्यांनी शाळा ट्रस्टीच्या घरातून १३ लाखाची रोकड आणि ६ तोळे दागिने असा ऐवज शस्त्राच्या धाकावर लुटून नेल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत पवई पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद करून सिसिटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरु केला आहे.
पवईतील जुहूर पॅलेस इमारतीत राहणाऱ्या शुभांगी नरसाळे या परिसरात असणाऱ्या एका शाळेच्या ट्रस्टच्या ट्रस्टमधील एक असून, प्रशासकीय व्यवहारांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मार्च शेवटचा आठवडा ते ७ एप्रिल या काळात विद्यार्थ्यांच्या फीजची रक्कम, आणि विविध कामासाठी मिळालेली रक्कम असे मिळून १३ लाख रुपये शनिवारी शुभांगी यांच्याकडे जमा झाले होते. ट्रस्टच्या मालकांच्या घरात लग्नकार्य असल्याने त्यांनी ती रक्कम त्यांना देण्यासाठी आपल्या ताब्यात घरात ठेवली होती.
रविवारी संध्याकाळी लग्नाचे ठिकाणी निघायचे असल्याने मी तयारी करून तिकडे जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी दरवाजावर टकटक झाली. कदाचित गाडीवाला आला असेल म्हणून माझ्या वृद्ध आईने दरवाजा उघडला. तोंडावर मास्क घातलेले दोन इसम दरवाजा ढकलून घरात घुसले आणि माझ्यावर बंदूक (कट्टा) ताणून माझ्याकडे असणारी १३ लाखाची रक्कम आणि सहा तोळे दागिने असे त्यांनी घेवून तेथून पळ काढला, असे पोलिसांना दिलेल्या जवाबात शुभांगी यांनी सांगितले आहे.
“आम्ही भादवि कलम ३९२, ४५२, ५०६ (२), ३४ सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार गुन्हा नोंद करून, सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे विविध टीम बनवून तपास सुरु केला आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.
चोरटे हे ओळखीच्या व्यक्तीमधील असावेत किंवा त्यांना कोणीतरी ओळखीच्या माणसाने याची खबर दिली असण्याची शक्यता असल्यामुळे पवई पोलीस त्या अनुषंगाने सुद्धा तपास करत आहेत.
“इमारत आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या सिसिटीव्हीमध्ये चोरटे प्रवेश करताना तसेच बाहेर निघताना दिसून येत आहेत. पुढे ते एका रिक्षात बसून निघून गेल्याचे सुद्धा आढळून आले आहे. सिसिटीव्ही फुटेज चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे रिक्षा नंबर आणि आरोपींचे फोटो स्पष्ट दिसत नसले तरीही आम्ही फोटोंना आपल्या रेकॉर्डमध्ये तपासत असून, आमच्या सर्व खबऱ्याना सुद्धा पाठवले आहेत” असे संदर्भात बोलताना आणखी एक तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
No comments yet.