गेला आठवडाभर मुंबईत पडलेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी त्याचे चटके मात्र अजूनही सोसावे लागत आहेत. पवई, चांदीवली, साकीनाका भागातील अनेक संरक्षक भिंतींना पावसामुळे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत.पवईतील भक्तांनी कॉम्प्लेक्समधील पंचऋतू येथील गुंडेच हिल इमारती समोरील संरक्षक भिंत कमकुवत होत पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. चांदीवली-हिरानंदानीला जोडणाऱ्या या कॉम्प्लेक्समधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. कोणत्याही क्षणी भिंत रस्त्यावर कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. पावसामुळे ही भिंत रस्त्यावर पडेल की काय या धास्तीनेच येथून प्रवास करणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
तर दुसऱ्या ठिकाणी हरिओमनगरला (जिजामाता सोसायटी) जाताना मँगो गार्डन जवळील संरक्षक भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना जीव मुठीत धरून ये जा करावे लागत आहे. महानगरपालिकेने याकडे वेळीच लक्ष घालून लवकरात लवकर दखल घ्यावी अशी येथील रहिवाशांनी मागणी केली आहे.
याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. मात्र ही महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ज्यांच्या मालकी हक्काची जागा आहे, त्यांनीच या धोकादायक भिंतीची दुरुस्ती करावी असे महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी सांगत हात झटकले आहेत. या ठिकाणची भिंत ही धोकादायक अवस्थेत असल्यामुळे येथील रहिवाशांना महानगरपालिकेची नोटीस देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
No comments yet.