व्यावसायिकाच्या घरातून २० लाखांची रोकड चोरी करणाऱ्या ड्रायव्हरला नागपूरमधून अटक

पवई येथील एका व्यावसायिकाच्या घरातून २० लाख रुपयांची रोकड चोरल्याच्या आरोपात व्यावसायिकाच्या ड्रायव्हरला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर येथे पळून गेलेल्या या ड्रायव्हरचा अवघ्या काही तासांतच शोध घेत पवई पोलिसांनी एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

तक्रारदार, विजय कुमार सिंह हे पवई येथील लेकहोम येथे राहत असून, पाठीमागील ३० वर्षापासून टॅक्स आणि फायनान्स कन्सल्टन्सी चालवतात. कामानिमित्त त्यांचे नेहमीच नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात येणे-जाणे होत असते. यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या बी एम डब्ल्यू कारला चालवण्यासाठी १५ सप्टेंबरपासून मूळचा वर्ध्याचा असणारा शुभम घाटे (२९) याला चालक म्हणून नियुक्त केले होते. शुभम देखील त्यांच्यासोबतच राहत होता.

“६ नोव्हेंबरला तक्रारदार हे परदेशात फिरण्यासाठी गेले होते तेव्हा शुभम हा पवई येथील त्यांच्या घरातच राहत होता. त्यांना ते कधी येणार आहेत याबाबत एसएमएस करून त्याने त्यांच्याकडे विचारणा केली होती. १० नोव्हेंबरला तक्रारदार हे मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांनी शुभम याला फोन केला, मात्र त्याचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने त्याच्या नंबरवरून एका व्यक्तीने फोन करून शुभम याचा मित्र बोलत असल्याचे सांगत शुभमचा अपघात झाला असून, त्याला ठाणे येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगितले.” असे याबाबत बोलताना पवई ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मी माझ्या ऑफिसमधील मुलाला फोन करून ऑफिसमध्ये असणारी माझ्या घराची चावी मागवून घेतली आणि मुलाला ठाणे येथे रुग्णालयात जावून शुभमची तब्येत जाणून घेण्यास सांगितले. मी घरी असताना रात्री १.०४ वाजता फोन करून ऑफिसमधील मुलाने ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालयात शुभम घाटे नामक कोणीच व्यक्ती दाखल नसून, आसपासच्या पोलीस ठाण्यात चौकशी केली असता असा कोणताच अपघात या परिसरात झाला नसल्याचे सांगण्यात आल्याचे सांगितले . असे तक्रारदार सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जवाबात म्हटले आहे.

“तक्रारदार यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आपले कपाट तपासले असता त्यांनी कपाटात ठेवलेल्या ३० लाखापैकी २० लाख रुपये (५०० रुपयाच्या १०० नोटा असलेले ४० बंडल) गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शुभम १० नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता सोसायटीत आला होता आणि १० वाजता एक ओला कारने निघून गेल्याचे आढळून आले. जाताना त्याच्याजवळ २ बॅग असल्याने त्यानेच घरात चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

फुटेजमधील छायाचित्र सोशल माध्यमे आणि खबऱ्याच्या माध्यमातून पोलिसांनी पसरवत तपास सुरु केला. “तांत्रिक माहिती आणि खात्रीलायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर नागपूरमधून आम्ही आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेली रक्कम देखील हस्तगत केली आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

पवई पोलीस भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार गुन्हा नोंद करून या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. त्याच्या या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अजून कोणी साथ दिली होती का? याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!