हम पोलिस के आदमी है | तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरू नका. दागिने काढून बॅगेत ठेवा असे सांगत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे हातचलाखीने ९० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना मंगळवारी पवई, एसएम शेट्टी शाळा बस थांब्याजवळ घडली. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु आहे.
पवईतील आयआयटी स्टाफ कॉलोनी परिसरात राहणारे विजयन आनंद (७२) हे मंगळवारी किरकोळ सामान आणण्यासाठी आयआयटी मार्केट येथे चालले होते. एसएम शेट्टी शाळा बस थांब्याजवळ ते उभे असताना दोन इसम मोटार सायकलवरून त्यांच्या जवळ आले. ‘हम पोलिसके आदमी है | चैन और अंगुठी निकालके बॅग मे रखो,’ असे त्यांनी आनंद यांना सांगितले.
मी आपली चैन आणि अंगठी काढून बॅगेत ठेवत असतानाच त्यातील एका इसमाने उधर मत रखना, वो छोटे कप्पे मे रखना. ये देखो आपका सामान इस कप्पे मे रखा है, असे मला सांगितले. ते निघून गेल्यावर मला शंका आल्याने मी बॅग उघडून पाहिले असता माझी अंगठी आणि चैन गायब होती. असे आनंद यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
“पाठीमागील काही दिवसात जबरी चोरी आणि अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्या मुंबईत पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. या संदर्भात आम्ही नागरिकांमध्ये सतत जनजागृती करत आहोत. पाठीमागील आठवड्यात पोलीस असल्याचे सांगत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना आमच्या पथकाने पाठलाग करत अटक केली आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
१८ ग्राम वजनाची सोन्याची चैन आणि १० ग्राम वजनाची अंगठी फसवणूक करून चोरी केल्याबद्दल दोन अज्ञात इसमांविरुद्ध भादवि कलम ४२०, १७०, ३४ नुसार गुन्हा नोंद करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.