पवईकरांसह अनेक मुंबईकरांना जादूटोण्यातून भूत उतरवत असल्याचे सांगत गंडा घालणाऱ्या आई आणि मुलाच्या जोडीतील मुलाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याची माहिती मिळताच आई पसार झाली आहे. पवईतील एका महिलेने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना तक्रार करताच पवई पोलिसांनी ही कारवाई केली.
या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईत राहणारी महिला कुसूम लता (बदललेले नाव) हिचा मुलगा वारंवार आजारी पडत असल्याने त्याला नक्की काय झाले आहे हे पाहण्याकरता ती मुलासह चैत्यावाडी, तुंगागाव येथे महिला नामे सुमन जाधव (६५) हिच्याकडे गेली होती. यावेळी तिचा मुलगा अनिल जाधव (४०) यांनी कुसूम लता हिला तुझ्या मुलाला भूतबाधा झाली आहे, असे सांगत त्याच्यावर उतारा करण्यासाठी १०,००० रुपयांची मागणी केली.
“कुसूम लता यांनी ऑक्टोबर महिन्यात सुमन आणि अनिल यांना दहा हजार रुपये देत ३ वेळा त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या घरी जावून उतारा करून घेतला. मात्र त्यानंतरही मुलाची प्रकृती ठीक होत नसल्याने तिने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले,” असे याबाबत बोलताना पोलीस सूत्रांनी सांगितले.
मुलाची प्रकृती ठीक होताच सुमन आणि अनिल यांनी बहाणा करून आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच कुसूमने पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला.
भादवि कलम ४२०, ३४ सह महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतीबंध अधिनियम २०१३’च्या कलम ३ (१) व (२) अनुसार पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
आरोपींच्या घरात पोलिसांना पितळी मुखवटे, मूर्ती, नारळ असलेले कलश, हिरवे कापलेले व अख्खे लिबू, बिब्बा, अभिर, गुलाल, कुंकू, हळद, भस्म, चामडी चाबूक, वेताची काठी असे जादू टोण्यासाठी दाखवले जाणारे साहित्य मिळून आले. “आम्ही हे सर्व सामान पंचनामा करून ताब्यात घेत, आरोपी मुलगा अनिल परशुराम जाधव याला अटक केली आहे, असे पवई पोलिसांनी सांगितले.
यातील मुख्य आरोपी सुमन जाधव ही मुलाच्या अटकेनंतर पसार झाली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या नावाखाली अनेक भोळ्या भाबड्या नागरिकांना फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये असे आवाहन सुद्धा यावेळी पोलिसांतर्फे करण्यात आले.
No comments yet.