पवई परिसरातील एक महागडी दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली
मुंबई आणि नवी मुंबईच्या विविध भागातून महागड्या मोटारसायकल चोरी करून त्या सुट्ट्या भागात विकणाऱ्या टोळीच्या ४ सदस्यांना गुन्हे शाखा ७ कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. कय्यूम ईद्रिस खान (४३) सोहेब राजू खान (२०), मुदसीर फैज़ल खान उर्फ़ चिंटू (२१) आणि समीर अमर खान (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौकडीला पुढील तपासासाठी माटुंगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पवई, माटुंगा, वाशी, नवीमुंबई, एपीएमसी, तुर्भे या परिसरातून केटीएम, आर १, पल्सर सारख्या महागड़्या शेकडो दुचाकी आतापर्यंत या चौकडीने चोरल्याचा संशय आहे. चोरी केलेली दुचाकी न-विकता त्याचे सुट्टे भाग बाजारात विकण्याचे काम ही टोळी करत होती.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा कक्ष ७ अधिकाऱ्यांना एक टोळी दुचाकी चोरी करून तिचे सुट्टे भाग विकत असून, ही टोळी गोवंडी भागात सुट्टे भाग विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती.
माहितीच्या आधारे गोवंडीतील शिवाजीनगर भागात त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. टोळी सामान विकायला आली असतानाच पोलिसांनी घेराव टाकत चारही आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान या टोळीने पवई, माटुंगा, वाशी, नवीमुंबई, एपीएमसी, तुर्भे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी केल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी सुद्धा हस्तगत केली आहे.
या टोळीला पुढील तपासासाठी माटुंगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
No comments yet.