पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. हिरानांदानीतील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित केल्याने नागरिकांचा तीव्र विरोध.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हॉकिंग झोन अंतर्गत मुंबईतील २४ विभागांमध्ये २२०९७ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठे बसून करावा म्हणजेच फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग झोन) सोमवारी महापालिकेने जाहीर केले. या घोषणेनुसार पालिका एस विभागात एकूण ४२५० ओत्यांना मान्यता देण्यात आली असून या विभागात येणाऱ्या पवईमधील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे.
पवईतील फिल्टरपाडामधील एका ठिकाणी ३८, आयआयटीमध्ये दोन ठिकाणी १२३ तर हिरानंदानीमधील ५ रोडवर मिळून १९६५ ओट्यांना मंजुरी दिल्याचे पालिकेने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या १२ फेब्रुवारी २००७ च्या निर्णयाचा दाखला देत दाखवण्यात आले आहे.
पालिकेच्या या निर्णयानुसार हिरानंदानीत दाखवण्यात आलेल्या हॉकिंग झोनला येथील स्थानिकांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शवला आहे. पवईकरांनी याबाबत विरोध नोंदवतानाच पालिकेकडे या रस्त्यांना फेरीवाला मुक्त ठेवण्यात यावे म्हणून मागणी केली आहे. आयआयटी व फिल्टरपाडा येथे दाखवण्यात आलेल्या जागेंवर आधीपासूनच फेरीवाले बसत असल्याने येथील नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध दिसून आला नाही आहे.
आयआयटी येथील अपना बजार रोडवर आदि शंकराचार्य मार्ग ते प्रशांत अपार्टमेंट रोड आणि झुरी कंपाऊंड – दुर्गादेवी मार्गावर प्रशांत अपार्टमेंट ते एसजीएफ/११/०११ व वाचनालय ते दुर्गादेवी उद्यान या भागाला फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. फिल्टरपाडा येथील मोरारजी नगर ते दर्गा (पश्चिम) भागात फेरीवाला क्षेत्र राहील.
हिरानंदानीत क्लिफ एव्हेन्यू रोडवर हेरीटेज इमारत ते रिज स्ट्रीट (पूर्व), सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर ईपि/एसजीएफ/१३/०९३ ते ०८२ (पूर्व), टेक्नोलॉजी स्ट्रीटवर ईपि/एसजीएफ/२५/००२ ते ०३४ (दक्षिण), फॉरेस्ट स्ट्रीटवर ईडी/०३२ (पूर्व) तर ऑर्चीड एव्हेन्यूवर म्हाडा सोसायटी ते गणेशनगर या भागात फेरीवाले क्षेत्र असणार आहे.
२००७ साली सुद्धा पवईतील हिरानंदानी भागात फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्यात आली होती. मात्र स्थानिकांच्या विरोध आणि काही समाजसेवी संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने अखेर त्रि-सदस्य समितीची नियुक्ती करून परिक्षणातून निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. सर्वेक्षणाला पोहचलेल्या त्रिसदस्य समितीलाच घेराव घालत पवईकरांनी विरोध दर्शवल्यानंतर २००७ साली येथील रस्त्यांना फेरीवाला क्षेत्रातून वगळण्यात आले होते. मात्र यावर्षी या रस्त्यांवर पुन्हा फेरीवाला क्षेत्र दाखवत पालिका पवईकरांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे याचा विरोध दर्शवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे.
फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्यासाठी पालिकेने जुलै २०१४ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते; ज्यावेळी ९९४३५ फेरीवाल्यांचे अर्ज केले होते. छाननीनंतर फेरीवाल्यांना नोंदणी व व्यवसाय प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी ओटे निश्चित करणे आवश्यक असल्यामुळे फेरीवाला क्षेत्र पालिकेने घोषित करण्यात आली आहेत.
शहर फेरीवाला समिती सदस्य नेमण्यासाठी पालिकेने सोमवारी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सात शहर फेरीवाल्या समितीमध्ये सहा सदस्य नेमले जाणार आहेत. समितीसाठी सहा सदस्यांमध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांचे दोन प्रतिनिधी तर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनचे दोन प्रतिनिधी, व्यापारी संघांचा एक प्रतिनिधी आणि पणन संघांचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.
न्यायालयाने २००७ मध्ये फेरीवाला क्षेत्र निश्चित केले होते, ज्याला दहा वर्षांचा कालावधी उलटला आहे. पालिकेने घोषित केलेल्या हॉकिंग झोनबाबत कोणास हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी त्या १८ डिसेंबर, २०१७ पर्यंत पालिकेच्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवाव्यात असे आवाहन सुद्धा पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
No comments yet.