पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरातील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित करण्यात आले आहे. फेरीवाले येण्याने होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानी गार्डन रहिवाशी फेडरेशनतर्फे हिरानंदानी येथे शांततापूर्वक विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाजसेवी संस्थांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
अधिकृत फेरीवाल्यांना बसून व्यवसाय करता यावा यासाठी फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग झोन) महापालिकेने जाहीर केले. पालिका एस विभागात एकूण ४२५० ओट्यांना मान्यता देण्यात आली असून, पवईमधील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे.
२१२६ ओट्यांपैकी हिरानंदानीमधील प्रमुख ५ रस्त्यांवर मिळून १९६५ ओट्यांना मंजूरी देण्यात आली आहे. या हॉकिंग झोनला येथील स्थानिकांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी विरोध दर्शवला आहे. पालिकेतर्फे देण्यात आलेल्या मुदतीत येथील स्थानिक आणि रहिवाशी संस्थांनी इमेल आणि पत्रांद्वारे मोठ्या प्रमाणात आपला विरोध नोंदवल्यानंतर आज स्थानिकांनी रस्त्यांवर उतरून आपला विरोध नोंदवला.
हातात विरोधाचे फलक घेउन स्थानिकांनी हेरीटेज उद्यान येथून विरोध मोर्चा काढत सर्व प्रमुख रस्त्यांवरून फिरत फेरीवाला क्षेत्राला आपला विरोध दर्शवला. या मोर्चात स्थानिक नागरिकांसह अनेक स्वयंसेवी कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि दुकान मालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी पुढील आठवड्यात पाहणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments yet.