पवईतील हिरानंदानी रुग्णालयात चालणारे किडनी रॅकेट गेल्या महिन्यात उघडकीस आले आहे. ज्यात ९ लोकांना अटक करण्यात आली होती. याचाच तपास करणाऱ्या पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच डॉक्टरांना मंगळवारी रात्री अटक केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजित चटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ अनुराग नाईक, डॉ मुकेश शेटे, डॉ मुकेश शहा, व डॉ प्रकाश शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.१९९४ च्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या कलम १२ व २१ नुसार ही अटक करण्यात आली आहे. आज (बुधवारी) त्यांना अंधेरी कोर्टात हजर केले जाईल.
पैशाचे आमिष दाखवून गरिब गरजूंना फसवून, खोट्या कागदपत्रांच्या आधारावर हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट चालू असल्याची माहिती इंटक या संस्थेला मिळाली होती. ज्यांनी पोलिसांच्या मदतीने जुलै महिन्यात हिरानंदानी रुग्णालयात चालू असलेल्या या रॅकेटचा भांडाफोड केला होता.
सुरत येथील व्यावसायिक ब्रिजकिशोर जैस्वाल (४८) यांनी खोटी कागदपत्रे सादर करून आनंद गुजरात येथील किडनी दाता शोभा ठाकूर त्यांची पत्नी असल्याचे भासवून किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया केली होती. शस्त्रक्रिया सुरु असतानाच पवई पोलिसांनी हिरानंदानी रुग्णालयात छापा टाकत ही कारवाई केली होती. ज्यात पवई पोलिसांनी रुग्ण ब्रिजकिशोर जैस्वाल व शोभा ठाकूर सह भैजेंद्र भिसेन (मुख्य आरोपी),भरत शर्मा (मुंबई एजेंट), इक़्बाल सिद्दिकी ((मुंबई एजेंट)) व किशन जैस्वाल (रुग्णाचा मुलगा), निलेश कांबळे (हिरानंदानी हॉस्पिटलमधील अवयव प्रत्यारोपण समन्वयक), ख्वाजा पटेल (बनावट कागदपत्र बनवणार), युसुफ बिस्मिल्लाह दिवान (गुजरातमधील एजंट) अशा ९ आरोपींना अटक केली होती.
राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारावर मंगळवारी उशिरा पवई पोलिसांनी कारवाई करत, “१९९४ च्या मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याच्या कलम १२ व २१ नुसार हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय संचालक व तीन डॉक्टरांना अटक केली आहे”, असे मुंबई पोलीस माहिती व जनसंपर्क अधिकारी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अटक आरोपींवर मानवी अवयव प्रत्यारोपण बाबत २०१४ मध्ये सुधारणा करण्यात आलेले कलम १९ सुद्धा लावण्यात आलेले आहे. या कलमानुसार आरोपीला दहा वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षेचे तरतूद आहे.
यावेळी आवर्तन पवईशी बोलताना इंटक संस्थेचे सुरेश गुप्ता म्हणाले, “किडनी रॅकेटच्या भांडाफोडीच्या पहिल्या दिवसापासून आम्ही यात हिरानंदानी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा सहभाग असल्याचे सांगत होतो. अखेर तपासानंतर आज त्यांना अटक झाली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालकाला सुद्धा यात अटक झाली असल्याने याची पाळेमुळे कितपत खोल रुतली आहेत हे स्पष्ट आहे. मुंबईतील अजूनही काही नामांकित रुग्णालये व डॉक्टरांचे हात या किडनी रॅकेटमध्ये गुंतलेले आहेत. लवकरच आम्ही त्यांचेही पितळ उघडे पाडू.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.