गेली अनेक वर्षे मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्तांची चालू असलेली धडपड अखेर संपुष्टात आली आहे. लवकरच पवईमधील आयआयटीजवळ जेव्हीएलआरवर असणारे मारुती मंदिर हे हटवून बाजूलाच असणाऱ्या राम मंदिरात येथील मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ५ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर मालक परांजपे यांनी याला संमती दर्शवली असून, विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ डिसेंबरला बाजूला असणाऱ्या मारुती दर्शन इमारतीत असणाऱ्या राम मंदिरात येथील हनुमानाची मूर्ती हलवण्यात येणार आहे. मात्र भक्तांकडून याचा तिव्र विरोध होत असून, याच दिवशी मोठे जन-आंदोलन घेण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून मारुती मंदिर उभे आहे. याबाबत १९६२ – ६३ सालचा सातबाराचा उतारा ही मंदिर प्रशासनाकडे उपलब्ध आहे. जेव्हीएलआरच्या निर्मिती वेळी मंदिर रस्त्याच्या मधोमध येऊन वाहतुकीला अडसर होत असल्याने याला हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती मात्र पवईकर जनतेने आणि भक्तांनी आंदोलनाचे शस्त्र उगारल्याने कारवाई रोखण्यात आली. ज्यानंतरही पालिका प्रशासन आणि शासनाकडून मंदिर हटवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र यश आले नाही.
पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हीलच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा ०४.१०.२०१० रोजी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या पारित करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत, पालिका एस विभागाने ०६ एप्रिल २०१७ रोजी मंदिर प्रशासनाला ७ दिवसाच्या आत हनुमान मंदिर हटवा अन्यथा निष्कासनाच्या कारवाईला सामोरे जा अशा आशयाची नोटीस बजावली होती. ज्यानंतर स्थानिकांनी सह्यांची मोहीम राबवून प्रशासनाकडे मंदिर पाडण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतरही पुन्हा ८ मे २०१७ रोजी पुन्हा जुन्या नोटीसीचा संदर्भ देत पालिका ‘एस’ विभागातर्फे मंदिर मालक ह. श्री. परांजपे यांच्या नावे यांना नोटीस देवून दोन दिवसात मंदिर काढण्यात यावे अन्यथा निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
दुसऱ्या नोटीसीनंतर कारवाईची टांगती तलवार पाहता मंदिर प्रशासनाने न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल करून सदर मंदिर १९२५ पासून आहे. मंदिर स्वमालकीच्या जागेत उभे केले होते. पालिकेने हटवण्याची नोटीस दिली आहे, मात्र त्यासाठी पर्यायी जागेची कोणतीही व्यवस्था देण्यात आली नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.
याचिकेवर माननीय न्यायालयाने “याचिकाकर्त्यांनी मारुती मंदिर नवीन ठिकाणी (राम मंदिर) येथे हलवण्यास संमती दिली आहे. जुन्या मंदिरात असणारी मूर्ती १५ डिसेंबर २०१७ पूर्वी नवीन मंदिरात हलवण्यात यावी. ज्यानंतर त्वरित जुन्या मंदिराच्या ठिकाणी असणारे बांधकाम सुद्धा हटवण्यात यावे. बांधकाम दिलेल्या वेळेत हटवले गेले नाही तर संबंधित प्रशासन किंवा पालिकेने ते हटवावे. नवीन ठिकाणी मूर्ती हटवण्याच्या वेळी याचिकाकर्ते आणि कारवाई करणाऱ्या यंत्रणेला आवश्यक पोलीस सुरक्षा असल्याची खातरजमा करून घेण्याची जबाबदारी पालिकेची राहील.” असा आदेश देत मारुती मंदिर हटवण्याचे सर्व मार्ग मोकळे केले आहेत.
याबाबत परांजपे यांच्याशी संपर्क झाला नसून, विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ डिसेंबर रोजी जुन्या (मारुती) मंदिरातून नवीन (राम) मंदिरात पूर्ण विधीपूर्वक मूर्ती हलवण्यात येणार आहे. भक्तांनी दिलेल्या आंदोलनच्या इशाऱ्याला पाहता कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा यावेळी ठेवण्यात आला आहे. आवश्यकता पडल्यास जमावबंदीचे आदेश सुद्धा देण्यात येतील. त्यामुळे आयआयटी येथील जेव्हीएलआरवरील पवईचे ऐतिहासिक वारसा असणारे मारुती मंदिर अखेर हटणार हे आता नक्की झाले आहे.
fblike url=”www.facebook.com/avartanpowai.info” style=”standard” showfaces=”false” width=”600″ verb=”like” font=”arial”]
No comments yet.