मुंबई : आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकत्र येत मानवी साखळी रचली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने २२३८ झाडे तोडण्याची मंजुरी दिली. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी रचली.
वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तरुणाई आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत घोषणा दिल्या. आज सकाळी ११ वाजता शिस्तबद्ध पद्धतीने पर्यावरणप्रेमींकडून मानवी साखळी रचण्यात आली. यात अनेक पर्यावरणप्रेमी संस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
सोशल मीडियावर ‘आरे वाचवा’ या मोहिमेत सामील होण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून आवाहन करण्यात आले. शुक्रवारी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर पर्यावरणप्रेमींनी याबतीत पोस्टर झळकावत लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. पर्यावरणप्रेमींच्या या आवाहनाला मुंबईकरांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा सहभाग
आरे वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आरे वाचवा मोहिमेत सहभाग घेत वृक्षतोडीविरोधात निषेध नोंदवला. शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी वृक्षतोडीच्या या निर्णयाविरोधात विरोध नोंदवला.
विरोध असताना देखील परवानगी
आरेमधील वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणावर हरकती घेतल्या, असे असताना देखील हा विरोध डावलत वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात आली. या वृक्षतोडीमुळे जैवविविधतेचे, मुंबईकरांचे आणि प्रामुख्याने येथील आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
No comments yet.