जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने मुंबईतही प्रवेश केला आहे. या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी आता शासनासह पालिकेने सुद्धा कंबर कसली आहे. यानुसारच ३ एप्रिल पर्यंत पवईतील ३ विविध परिसरांना सिल करण्यात आले आहे. जर पवईकर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येणे बंद नाही केले तर पवईतील अजूनही काही परिसर सिल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित मिळून आलेल्या इमारती/भागांना सिल केले आहे. यानुसारच पालिका ‘एस’ विभागांतर्गतातील पवईतील तीन ठिकाणे सिल करण्यात आली आहेत. हिरानंदानी आणि आयआयटी पवई येथील रहिवाशी संकुलाचा भाग अशी दोन ठिकाणे आधीच सिल केली असताना काल रात्री (०२ एप्रिलला) आयआयटी पवई येथील चाळ सदृश्य लोकवसाहतीला सुद्धा सिल केले आहे.
०३ एप्रिलला परिमंडळ १०चे पोलीस अपायुक्त अंकित गोयल यांनी या परिसराची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. “पालिकेने सदर परिसर सिल केला असून, आम्ही या परिसराला सुरक्षा दिली आहे. या रहिवाशी सोसायटीचे दोन्ही प्रवेश बंद करण्यात आले आहेत.” असे यासंदर्भात बोलताना गोयल यांनी सांगितले.
विशेष म्हणजे गुरुवारी, २ एप्रिलला सिल करण्यात आलेला परिसर हा पवई येथील डोंगर भागात वसलेला चाळ सदृश्य वस्तीतील एक छोटा भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यामुळे या भागात संपर्कात येण्यातून प्रसाराची शक्यता खूप मोठी असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
पवईतील या भागांमध्ये जनजागृती झाली असतानाही मोठ्या प्रमाणात आजही नागरिक रस्त्यांवर ठिकठिकाणी टोळक्यांनी फिरताना बसताना आढळून येत आहेत. त्यामुळे या भागातील धोका अधिक वाढत असून, संपूर्ण पवई परिसराला सिल करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले की, “सिल केलेल्या परिसरात आम्ही आवश्यक ती सर्व सुरक्षा दिली आहे. येथील नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत बाहेर जाण्याचा किंवा बाहेरील व्यक्तीने त्या परिसरात जाण्याचा हट्ट करू नये. असे प्रकार अध्याप तरी घडलेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी यापुढेही अशीच काळजी घ्यावी.”
ते पुढे म्हणाले “अनेक भागात नागरिक आजही विनाकारण बाहेर पडत आहेत त्यांनी घरात राहणे आवश्यक आहे. बाजार भागात होणारी गर्दी टाळावी.”
कोरोना बाधित रुग्णांची ०३ एप्रिल २०२०ची अपडेट
राज्यात ४९० कोरोना बाधित; ५० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात आज ६७ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबईतील, तर मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा १० रुग्ण आहेत. पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. वाशिम आणि रत्नागिरीमध्येही प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आज ४९० झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
एकूण ४९० बाधितांपैकी ५० जणांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यात ६ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी १ रुग्ण, तर २ रुग्ण मुंबईमधील आहेत.
सध्या राज्यात ३८,३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज एकूण ५९५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत.
निजामुद्दीन येथील मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात गेलेल्यांचा राज्यातील सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. प्राप्त यादीतील १२२५ व्यक्तींपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला आहे. या व्यक्तींपैकी ७ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत, तर एक जण हिंगोलीतील आहे. त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.