प्राध्यापकाच्या मित्राचा मेल हॅक करून त्याच्या आधारे कोविड-१९ आजाराच्या उपचारासाठी पैशांची मागणी करत आयआयटी मुंबईच्या एका प्राध्यापकाची २ लाखाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच पवईत समोर आला आहे. या संदर्भात माहिती तंत्रद्यान कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून पवई पोलीस तपास करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश अडकून पडलेला असताना, या सगळ्यांचा ऑनलाईन चोरट्यांनी फायदा उचलला आहे. या काळात नागरिक ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य देत असल्याने, ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई येथील आयआयटी मुंबईमधील एका प्राध्यापकाला त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीचा इमेल आयडीवरून २४ एप्रिलला एक ई-मेल आला होता. मी व माझ्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाली असून, आम्हाला रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. आम्हाला पैशांची गरज आहे. फोनवर बोलणे शक्य नसल्याने मी मेल करत आहे. असे या व्यक्तीने मेलमध्ये नमूद केले होते.
या पूर्वी सुद्धा मित्राच्या त्याच ई-मेल आयडीवरून मेल आले होते. त्यामुळे त्यात अविश्वास दाखवण्यासारखे काहीच नव्हते. असे या प्राध्यापकांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
यानंतर प्राध्यापकांनी २ लाखाचे ऑनलाईन गिफ्ट व्हाऊचर खरेदी करून त्याची माहिती त्या ई -मेलमध्ये दिलेल्या दुसर्या ई-मेल पत्त्यावर पाठवली. मात्र काहीच दिवसात पुन्हा एक ई -मेल आला ज्यात आणखी पैशांची मागणी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपल्या मित्राला संपर्क केला असता आपण किंवा आपल्या कोणत्याही नातेवाइकांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या ई-मेलवरून अशा प्रकारे अनेकांना ई-मेल गेल्याचेही त्यांनी सांगितले.
आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे प्राध्यापकांच्या लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली.
“चोरट्यांनी त्यांच्या मित्राचा इमेल हॅक करून हा गुन्हा केला असल्याचे समोर येत आहे. याबाबत आम्ही भादवि आणि माहिती अधिकार कायद्यातर्गत गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहोत” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
[…] हे सुद्धा वाचा: प्राध्यापकांच्या मित्राचा इमेल हॅक करून, २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक […]
[…] हे सुद्धा वाचा: प्राध्यापकांच्या मित्राचा इमेल हॅक करून, २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक […]