देशभर जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असतानाच पवईतील फुटपाथवरील एका बेवारस वडाच्या झाडाला महानगरपालिका ‘एस’ वॉर्ड उद्यान विभागातील उद्यान विद्या सहाय्यक अधिकारी अक्षया म्हात्रे आणि पवईतील नागरीकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या वाचवलेल्या वडाच्या झाडाला आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात पुनर्रोपण करण्यात आले आहे.
‘पवई, आयआयटी येथील हरेकृष्ण रोडवर फुटपाथवर एक वडाचे झाड असून, त्याला वाचवण्यासाठी पवईकरांनी पालिकेला विनंती केली होती. मात्र हे झाड हलवण्यापूर्वी त्याची योग्य निगा राखली जावी आणि त्याला पुरेशी जागा मिळावी याची खबरदारी पालिका घेत होती. अखेर ५ जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त ते झाड तेथून दुर्गादेवी शर्मा उद्यानात हलवण्यात आले आहे’ असे याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांनी सांगितले.
दुर्गादेवी शर्मा उद्यानाची नुकतीच पुनर्बांधणी करण्यात आली आहे. उद्यानात छोट्या छोट्या रोपट्यांची लागण करण्यात आली असून, पालिकेकडून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. वडाच्या झाडासाठी सुद्धा हे वातावरण पोषक असून, आता लवकरच पावसाला सुरुवात होईल असे वातावरण असल्याने झाडाचे या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात आले आहे.
यावेळी पालिका अधिकारी, एएमएएसएफएचे मुंबई सचिव रमेश जाधव, प्राणी आणि वृक्षमित्र बिपीन देढीया, पवई व्यापार संघाचे संतोष गुप्ता, मुन्ना गिरी, सचिन सातपुते, जावेद सर, विजय जाधव आणि समाजसेवक राजेश मस्तुद हे या उपक्रमावेळी उपस्थित होते.
No comments yet.