भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा करून पवईकर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे वस्त्रहरण करत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील ११ न्यायाधीशांच्या पिठाने अंतिम निर्णय येईपर्यंत कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली. या आनंददायी बातमीनंतर कुलभूषण यांच्या हिरानंदानी येथील घरासमोर जमा झालेल्या पवईकरांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
पवईकर व भारतीय सशस्त्र सेनेतून सेवानिवृत्त झालेले कुलभूषण जाधव हे भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे गुप्तहेर असून, बलुचिस्तानमधून कारवाया करत असल्याचा दावा करत त्यांना गेल्या वर्षी पाकिस्तानने अटक केली होती. ज्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयाविरोधात भारताने ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. ज्याबाबत भारत – पाकिस्तान असा दोघांचाही सोमवारी युक्तिवाद ऐकल्यानंतर काल (गुरुवारी) न्यायालयाने आपला निकाल दिला.
दुपारी ३.३० वाजता हेग येथील न्यायालयात ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही देशाच्या प्रतिनिधींसमोर निकाल ऐकवायला सुरुवात केली. पाकिस्तानने कुलभूषण यांच्यावर ठेवलेला हेरगिरीचा आरोप सिद्ध झालेला नाही. कुलभूषण जाधव हे भारतीय असल्याचे दोन्ही देशांना मान्य आहे. पाकिस्तानने जाधव यांना राजकीय आणि कायदेशीर मदत द्यायला हवी होती. व्हीएन्ना करारानुसार भारताने केलेली मागणी ही योग्यच आहे. आपल्या नागरिकाला कायदेशीर मदत करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. जाधव यांच्यावर अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांच्या फाशीला स्थगिती देण्यात यावी. जाधव यांना फाशी होणार नाही याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची असून, त्यांनी या निर्णयबद्दल घेतलेल्या निर्णयांची माहिती आंंतरराष्ट्रीय कोर्टाला देणे आवश्यक आहे असा निर्णय ११ न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष रॉनी अब्राहम यांनी दिला.
या निर्णयामुळे कुलभूषण यांची बाजू मांडण्यासाठी वकील देण्याचा भारताचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं ही पाकची जबाबदारी आहे; त्याचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही कोर्टानं दिला आहे.
सर्वतोपरी भारताच्या बाजूने लागलेल्या निर्णयाची बातमी समजताच संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पसरले होते. जाधव यांच्या हिरानंदानी, पवई येथील सिल्वरओक इमारतीच्या समोर मोठ्या संख्येने जमा झालेल्या पवईकरांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
काही पवईकरांनी याबाबत नोंदवलेल्या प्रतिक्रिया
न्यायालयाचा निर्णय आम्हाला सर्वोतोपरी मान्य आहे. हा दिवस आमच्या सर्वांसाठी एका सणापेक्षा कमी नाही आहे, म्हणूनच आम्ही फटाके फोडून आणि मिठाई वाटून दिवाळी साजरी करत आहोत. – शैलेश वानखेडे
हा सच्चाईचा विजय आहे ! तमाम भारतीयांची इच्छा होती कि कुलभूषण जाधवांना फाशी देण्यात येऊ नये. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळाला आहे आणि जाधव हे लवकरच भारतात परततील अशी आशा वाढीस लागली आहे. – प्रसाद चव्हाण
भारतीयांच्या प्रयत्नांना यश आले आहे, हा संपूर्ण भारताचा विजय आहे. या निर्णयाबद्दल माननीय न्यायालय, भारत सरकार आणि साळवे साहेब यांचे मनपूर्वक आभार.” – विद्यानंद काकडे
कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून, लष्करी न्यायालयात खोटा दावा चालवून, घाईगडबडीत कुलभूषण जाधव यांना शिक्षा देण्याचा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय ही जबरदस्त चपराक आहे. त्यांचे यापुढेही अजून बरेच बुरखे फाडले जाणार आहेत – विरेंद्र धिवार
फाशीवर स्थगिती आणली परंतु पाकिस्तानने हा अमान्य केला आहे आणि ते जाधव यांना यानंतर ही फासावर लटकवू शकतात, त्यामुळे भारत सरकारने एवढ्यावर हुरळून न-जाता त्यांना परत आणण्याची लढाई चालू ठेवणे आवश्यक आहे. – रविराज शिंदे
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय मान्य नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान आपली प्रकरणे दडपण्यासाठी हे सर्व कांगावे करत आहे. कुलभूषणच्या बाबतीत पाकिस्तान करत असणारे सर्व दावे हे निराधार आहेत. जाधव प्रकरणातून पाकिस्तान भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आतंकवाद पसरवणारा देश सिद्ध करण्याच्या प्रयत्न करत आहे. मात्र, न्यायालयाने त्यांचे सर्व दावे फौल ठरवत त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात पाकिस्तानचे सर्व सत्य जगासमोर येईल – पूर्व भारतीय गुप्तचर यंत्रणा अधिकारी
No comments yet.